देशाची सुरक्षितता लक्षात घेऊन भारतीय हवाई दलाने मोठा निर्णय घेतला आहे. जम्मू आणि काश्मीर सारख्या भागात संरक्षण परिस्थिती मजबूत करण्याच्या उद्देशाने हवाई दलाने श्रीनगर विमानतळावर प्रगत मिग- २९ लढाऊ विमानांचा एक स्क्वॉड्रन तैनात केला आहे. त्यामुळे आता पाकिस्तान आणि चीनबाजूची भारताची सीमा अधिक सुरक्षित झाली आहे.
जम्मू-काश्मीर हा भारताचा भाग पाकिस्तान आणि चीनच्या सीमेला लागून आहे. हा सीमावर्ती भाग तणावात असल्यामुळे येथील एअरबेसवर लढाऊ विमाने तैनात करण्याबाबत खूप दिवसांपासून चर्चा सुरू होती. भारताच्या पाकिस्तानच्या उत्तरेकडील सीमेचं रक्षण करणारे ट्रायडंट स्क्वॉड्रन श्रीनगरमधील या तळावर तैनात करण्यात आले आहे. ट्रायडंट्स स्क्वॉड्रनला सैन्यात ‘उत्तरचे रक्षक’ असेही म्हणतात.
काश्मीर खोऱ्यातील श्रीनगर हवाई दलाच्या बेसवर मिग- २९ ही लढाऊ विमाने सज्ज करण्यात आली आहेत. या एअरबेसवर आतापर्यंत मिग-२१ विमाने होती. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने बालकोटमध्ये एअर स्ट्राईक करत पाकिस्तानला दिलेल्या दणक्यात याचं विमानांनी महत्त्वाची कामगिरी बजावली होती. त्यानंतर पाकिस्तानने एफ- १६ विमानांनी भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. या मिग- २१ विमानांची जागा आता मिग- २९ विमानांनी घेतली आहे.
काश्मीर खोऱ्यात असलेल्या श्रीनगर एअरबेसची उंची मैदानी भागापेक्षा जास्त आहे. येथून दोन्ही चीन आणि पाकिस्तान देशांची सीमा जवळ आहे, अशा परिस्थितीत अल्पावधीतच वेगवान प्रतिसाद देणार्या विमानांची गरज होती. मिग- २९ हे विमान यासाठी योग्य आहे. कारण त्यामध्ये या परिस्थितीसाठी उत्तम विमान आणि लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रं आहेत, अशी माहिती भारतीय वायुसेनेचं स्क्वाड्रन लीडर विपुल शर्मा यांनी दिली आहे.
हे ही वाचा:
जया प्रदा यांना सहा महिन्यांचा तुरुंगवास, पाच हजारांचा दंड; काय आहे प्रकरण?
भाजपा नेत्या सना खान हत्येप्रकरणी आरोपीला अटक
स्वातंत्र्यदिनी राज्यातील १८६ कैद्यांची कारागृहातून होणार सुटका
मिग- २९ ची वैशिष्ट्ये
मिग- २९ मध्ये संघर्षाच्या वेळी शत्रूच्या लढाऊ विमानांना ठप्प करण्याची क्षमता आहे. हे विमान रात्रीच्या वेळी उड्डाण करण्यास सक्षम असताना लष्कराच्या महत्त्वाच्या ऑपरेशन्समध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्यास सक्षम आहे. मिग- २९ हे रशियाने डिझाइन केलेले दुहेरी इंजिन असलेले लढाऊ विमान आहे.