आजारी बिबट्यासोबत ‘सेल्फी’; त्याच्या पाठीवर स्वार होण्याचा प्रयत्न

मध्य प्रदेशातील जमावाच्या तावडीतून बिबट्याची सुटका

आजारी बिबट्यासोबत ‘सेल्फी’; त्याच्या पाठीवर स्वार होण्याचा प्रयत्न

आजारपणामुळे अशक्त झालेला बिबट्या मंगळवारी मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यातील एका गावात फिरत होता. मात्र, काही गावकऱ्यांनी त्याला अक्षरश: पाळीव कुत्र्यासारखे वागवले आणि त्याच्यावर स्वार होण्याचा प्रयत्नही केला. १० वर्षे वयाच्या या नर बिबट्यावरील अत्याचाराचे ‘फुटेज’ बुधवारी व्हायरल झाले असून त्यामुळे खळबळ उडाली आहे.

इंदूरपासून ९५ किमी अंतरावर असलेल्या इकलेरा गावात संध्याकाळच्या सुमारास बिबट्या सैरभैर फिरत होता. मात्र, तो गुरगुरत नसल्याने, तसेच हल्ला करत नसल्याचे दिसताच जमावाची भीड चेपली आणि जो तो त्याच्यासोबत छायाचित्र काढण्यासाठी सरसावला. सगळे जण हसत होते, तसेच थट्टा करत त्याचा पाठलाग करत होते. गर्दीतील काही माणसे त्याला त्रास देऊ नका, त्याला छेडू नका, असे सांगतानाही या व्हिडीओत ऐकू येत आहे. मात्र, त्याचा या जमावावर कोणताही परिणाम झाल्याचे आढळून आले नाही.

आणखी काही जण ‘चला, याला गावात घेऊन जाऊ’ असे म्हणताना ऐकू येतात. तर, काहींनी त्याच्यावर स्वार होण्याचाही प्रयत्न केला. सुदैवाने, गर्दीतील काहींनी ही कल्पना धुडकावून लावली आणि त्याला पुन्हा जंगलात नेण्याचा प्रयत्न केला. या व्हिडीओत अनेक गावकरी बिबट्यासोबत सेल्फी घेत असल्याचे आणि एक जण त्याच्या पाठीवर उडी मारण्याचा प्रयत्न करताना दिसतो आहे.

या घटनेची माहिती कळताच वनविभाग आणि पोलिसांना सतर्क करण्यात आले, त्यानंतर देवास आणि उज्जैन येथील वन पथकांनी या बिबट्याची माणसांच्या तावडीतून सुटका केली. ‘अधिसूचित जंगलातून वाहणाऱ्या कालीसिंध नदीजवळ बिबट्या आणि इतर वन्य प्राण्यांची हालचाल ही सर्वसामान्य घटना नाही’, असे देवासचे वनअधिकारी संतोष शुक्ला यांनी सांगितले. ‘पशुवैद्यकांनी ताबडतोब बिबट्याची तपासणी केली. तो अशक्त झाला होता. आम्ही त्याला पुढील उपचारासाठी बुधवारी इंडोरे प्राणीसंग्रहालयात हलवले,’ अशी माहिती शुक्ला यांनी दिली. ‘सुदैवाने, बिबट्याला कोणतीही दुखापत झाली नाही,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा:

‘इंडिया’च्या बैठकांचे आयोजन करणारे उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे विचार पायदळी उडवतायत

भारतात होणार पहिली ‘ग्लोबल इंडिया एआय- २०२३’ परिषद

अजितदादांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा, शरद पवारांनी पुतण्याविरोधात दंड थोपटले

जी२० च्या पाहुण्यांना त्रास नको म्हणून दिल्लीत लंगूरचे कटआऊट !

सर्वसाधारणपणे, बिबट्याचे आयुष्य १२ ते १५ वर्षे असते. गावकऱ्यांनी सांगितले की, त्यांनी प्राण्याला दुखापत केली नाही आणि काही लोकांनी त्याच्यासोबत सेल्फी घेतल्यावर ते त्याला जंगलाकडे नेण्याचा प्रयत्न करत होते. ‘गावकऱ्यांनीच आम्हाला त्या प्राण्याविषयी आणि तो कोणत्या दिशेने जात होता याची माहिती दिली. त्यांच्या माहितीच्या आधारे, आम्ही उज्जैनच्या पथकाशी समन्वय साधला आणि त्याची सुटका केली,’ असे शुक्ला यांनी सांगितले. बिबट्याला २४ तास निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे आणि त्याला कशाचा आजार आहे, याचे निदान करण्यासाठी वैद्यकीय चाचण्या केल्या जात आहेत, असे इंदूर प्राणीसंग्रहालयाचे प्रभारी डॉ. उत्तम यादव यांनी सांगितले.

Exit mobile version