कोड्यात टाकणारा निर्णय…कलर कोड रद्द

कोड्यात टाकणारा निर्णय…कलर कोड रद्द

मुंबई पोलीसांकडून १८ एप्रिलपासून लागू केला गेलेला कलर कोडचा निर्णय आता रद्द केला आहे. मुंबई पोलीसांनी ट्विट करत हा निर्णय जाहीर केला आहे. मुंबई पोलीसांच्या या नव्या निर्णयामुळे नागरीक मात्र कोड्यात पडले आहेत. अवघ्या ७ दिवसांत हा निर्णय रद्द का करण्यात आला याचे कोणतेच ठोस कारण कळलेले नाही.

रविवार, १८ एप्रिलपासून मुंबईत खासगी वाहनांसाठी कलरकोड सिस्टम लागू झाली होती. मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी यासंदर्भातील माहिती दिली होती. ज्यानंतर ट्विटरच्या माध्यमातूनही यासंदर्भातील माहिती पोलिसांनी दिली. अत्यावश्यक सेवांमध्येही वर्गवारी करत प्रत्येक सेवेसाठी काही गट करण्यात आले. या प्रत्येक गटासाठी एक रंग निर्धारित करण्यात आला होता. या रंगाचे स्टिकर त्या सेवेतील वाहनावर असणे बंधनकारक होते.

हे ही वाचा:

सीबीआयने केला अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल

देशातील ऑक्सिजन उत्पादकांशी मोदींचा संवाद

गडकरींचा एक फोन आणि महाराष्ट्राला मिळाले ३०० व्हेंटिलेटर

…आणि पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस महाराष्ट्रात दाखल

कलर कोड सिस्टमनुसार वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या गाड्यांसाठी लाल रंगाचं वर्तुळ लावणं बंधनकारक होते. भाजीपाल्याच्या गाड्यांसाठी हिरव्या रंगाचे तर इतर अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी पिवळ्या रंगाचे वर्तुळ असणे अनिवार्य केले होते. मुंबईत होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी हा खबरदारीचा उपाय अंमलात आणल्याचे म्हटले जात होते. या कलरकोडचा गैरवापर केल्यास ४१९ कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात येईल असेही सांगण्यात आले.

पण अवघ्या ६ दिवसांतच मुंबई पोलीसांनी आपला हा निर्णय रद्द केला आहे. मुंबई पोलीसांनी या संदर्भात ट्विट केले आहे. अत्यावश्यक सेवांचे लाल, पिवळा, हिरवा रंग असे वर्गीकरण बंद करण्यात आल्याचे या ट्विटमध्ये म्हटले आहे. पण मुंबईत दाखल होणाऱ्या वाहनांची तपासणी होणार आहे असे मुंबई पोलीसांकडून सांगितले गेले आहे. पण मुंबई पोलीसांनी कलर कोड असा तडकाफडकी का रद्द केला याचे कोणतेच कारण कळलेले नाही.

Exit mobile version