फुटबॉलचा सामना सुरू असताना आकाशातून वीज कोसळून खेळाडूचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना इंडोनेशियात घडली आहे. रुग्णालयाच्या वाटेवरच या खेळाडूने अखेरचा श्वास घेतला.
इंडोनेशियामध्ये एफसी बैनडुंग आणि एफबीआय शुबैंग या दोन संघादरम्यान मैत्रीपूर्ण सामना खेळला जात होता. हा सामना शनिवारी इंडोनेशियाच्या वेस्ट जावामधील सिलिवांगी स्टेडिअममध्ये खेळला जात होता. या दरम्यान सामना सुरू असतानाच खेळाडूवर आकाशातून वीज कोसळली.
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या दरम्यान खेळाडू आपल्या खेळाकडे लक्ष देत होते. मात्र तेव्हा हवामान चांगले नव्हते. त्याच दरम्यान खेळाडूवर अचानक आकाशातून वीज कोसळली. वीज कोसळत असतानाच तेथून आग बाहेर पडत असल्याचे दिसत आहे. वीज कोसळल्यानंतर हा खेळाडू तिथेच जमिनीवर कोसळला. दुसरा खेळाडूही या धक्क्याने कोसळला, परंतु तो लगेचच उठला. तर बाकीचे खेळाडू जीव वाचवण्यासाठी जमिनीवर झोपले. तर काहीजण बाहेरच्या दिशेने पळत सुटले. तर, या खेळाडूला वाचवण्यासाठी अन्य खेळाडू आणि वैद्यकीय पथकाने तातडीने मैदानावर धाव घेतली आणि त्याला बाहेर नेण्यात आले. तेव्हा तो जिवंत होता. त्याला रुग्णालयात नेले जात असतानाच त्याने अखेरचा श्वास घेतला.
हे ही वाचा:
केरळच्या सत्ताधारी खासदाराने मोदींसह घेतले जेवण!
रामायण, महाभारत काल्पनिक असल्याचे धडे दिल्यानंतर बंगळूरूमध्ये शिक्षिकेचे निलंबन
मंदिरातील ४० किलोच्या सिंहासनासह चोर पळाले
राज्यात माघी गणेशोत्सवाचा आनंद
वर्षभरातील दुसरी घटना
इंडोनेशियात फुटबॉलपटूवर वीज कोसळण्याची ही या वर्षभरातील दुसरी घटना आहे. सन २०२३मध्ये १३वर्षांखालील सोराटिन कप दरम्यान ईस्ट जावाच्या बोजोनगोरो येथे एका फुटबॉलपटूवर वीज कोसळली होती. तेव्हा मैदानावर उपस्थित सहा खेळाडूही विजेच्या तडाख्यात आले होते. मात्र या सर्वांना डॉक्टरांनी वाचवले होते.