‘न्यूज डंका’चा ‘मोदी- ३’ या दसरा- दिवाळी विशेषांकाचा बुधवार, १ नोव्हेंबर रोजी प्रकाशन सोहळा पार पडला. दादर मधील स्वातंत्र्यवीर स्मारक येथे हा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी भाजपा आमदार अतुल भातखळकर, ‘प्रतिपक्ष’चे भाऊ तोरसेकर आणि‘ऍनलायझर’चे सुशील कुलकर्णी हे मान्यवर उपस्थित होते. यावेळी ‘न्यूज डंका’चे मुख्य संपादक दिनेश कानजी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादाचा बुलंद आवाज या टॅग लाईनसह १२ जानेवारी २०२० रोजी ‘न्यूज डंका’ला प्रारंभ झाला. त्यानंतर ‘न्यूज डंका’चा पहिला दिवाळी अंक ‘सुशासन पर्व’ हा प्रकाशित झाला होता. नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा अंक काढण्यात आला होता. त्यानंतर दुसरा दिवाळी अंक होता ‘अमृतकाल’ आणि तिसऱ्या वर्षी ‘मोदी- ३’ असे तीन वर्षी तीन मोदींविषयी दिवाळी अंक काढण्यात आले. याला वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याचे दिनेश कानजी म्हणाले.
या दिवाळी अंकांच्या विषयानंतर अनेकांनी ही मोदी भक्ती किंवा अंध भक्ती आहे का? असा सवाल उपस्थित केला. पण, हल्ली एखाद्या मुखपत्राचे संपादकही स्वतःला तटस्थ पत्रकार म्हणवतात. ज्यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्यासाठी लेखणी वाहिली होती; त्याच्या अनुषंगाने त्यांना खासदारकी मिळाली ते सुद्धा तटस्थ पत्रकार आहेत. काही लोक असे आहेत जे खासदारकी मिळेल या अपेक्षेने आपली लेखणी झिजवत आहेत आणि स्वतः तटस्थ म्हणवत आहेत, अशी खोचक टीका दिनेश कानजी यांनी पत्रकारांवर केली.
ज्याप्रमाणे राज्यात पुरोगामी हा शब्द बदनाम आहे त्याप्रमाणेच तटस्थ पत्रकारिता ही सध्या बदनाम आहे, अशी टीका दिनेश कानजी यांनी केली. तटस्थ पत्रकारिता बाजूला ठेवत न्यूज डंकाची सुरुवात केली आणि राष्ट्रवादाचा आवाज बुलंद करण्यासाठी प्रयत्न केले. यासाठी नरेंद्र मोदी यांच्या नावाचे लेबल दिले तरी आम्हाला ते मान्य असल्याचे यावेळी दिनेश कानजी म्हणाले. नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादाचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. ज्या व्यक्तीने राष्ट्रवादाचा झेंडा खांद्यावर घेतला आहे त्या व्यक्तीचा टॅग डोक्यावर लावून घेण्यास काहीही त्रास नसल्याच्या भावना दिनेश कानजी यांनी व्यक्त केल्या आहेत.
मोदी- ३ का?
आम्हाला देशाचा पंतप्रधान असा नको आहे जो बॅंकॉगच्या वाऱ्या करत असतो. आम्हाला देशाचा पंतप्रधान असा नको आहे जो चीनची भलाभल करतो. आम्हाला देशाचा पंतप्रधान असा नको आहे जो विदेशी भूमीत जाऊन भारताची बदनामी करतो. आम्हाला देशाचा पंतप्रधान असा नको आहे जो ब्रिटीश भूमीवर जाऊन सांगतो इंडिया इज नॉट अ नेशन; इंडिया इज अ युनियन ऑफ स्टेट्स. आम्हाला देशाचा पंतप्रधान असा नको आहे ज्याला सर विश्वेश्वरय्या यांचे नाव बोलता येत नाही. पण, आम्हाला असा पंतप्रधान हवा आहे जो डोक्यावर उटनं लावतो. जो गंगा आरती करतो. बांगलादेशात गेल्यावर ढाकेश्वरीच्या मंदिरात नतमस्तक होतो. जपानच्या पंतप्रधानांना भगवद्गीता देतो. कोविड काळात भारताच्या ८० कोटी जनतेच्या पोटाची काळजी घेतो. उद्योजकांना संधी देतो, असा पंतप्रधान हवा असल्याच्या भावना दिनेश कानजी यांनी व्यक्त केल्या. मोदी- ३ या अंकातही याचं भावना व्यक्त केल्याचे दिनेश कानजी म्हणाले.
हे ही वाचा:
२० लाख अफगाणी नागरिकांना पाकिस्तान परत पाठवणार
कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसालाच जमावाने घेरून केली मारहाण
हमासचे ३०० तळ आणि भुयारांचे जाळे उद्ध्वस्त; हमासचा कमांडर ठार
ड्रग्स माफिया अली असगर शिराझी संबंधिताभोवती ईडीचा फास
नरेंद्र मोदींच्या पाठीशी जे लोक उभे आहेत त्यांची मोदींसाठी घाम गाळायची तयारी आहे; स्वतःच्या खिशात हात घालायची तयारी आहे. तसेच वेळ पडलीच तर रक्त सांडण्याचीही तयारी आहे. त्यामुळे ‘मोदी हाटाओ’ हा जो अपप्रचार सुरू आहे तो फार काही टिकणारा नाही कारण मोदींच्या पाठीशी उभे असलेले लोक हे निरपेक्ष भावनेने उभे आहेत, अशा भावना दिनेश कानजी यांनी व्यक्त केल्या.