भारत आणि मालदीवमध्ये सुरू असलेल्या तणावात भारत सरकारने मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारत सरकार मिनिकॉय बेटावर नवीन विमानतळ बांधणार आहे, असा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय येथून लढाऊ विमाने, लष्करी विमाने आणि व्यावसायिक विमाने चालवता येतील अशी योजना आहे. त्यामुळे भारताची लष्करी ताकद वाढणार असून पर्यटनाला देखील चालना मिळणार आहे.
सध्या लक्षद्वीपमधील आगती येथे एकच हवाई पट्टी आहे. सर्व प्रकारची विमाने या धावपट्टीवर उतरू शकत नाहीत. मात्र या नव्या धावपट्टीवर नागरी विमानांसह लष्करी विमानेही ये-जा करू शकणार आहे. या योजनेमुळे नौदल आणि हवाई दलासाठी हिंदी महासागर आणि अरबी समुद्रात मोहिमा आखण सोपे जाणार आहे. शिवाय चीनच्या वाढत्या कारवायांना आळा घालणे सोपे होईल. मिनिकॉय बेटावर हवाई पट्टी बांधण्याचा पहिला प्रस्ताव भारतीय तटरक्षक दलाने दिला होता.
सध्याच्या प्रस्तावानुसार, हे नवीन विमानतळ भारतीय हवाई दलाकडून चालवले जाईल. लक्षद्वीपमध्ये नौदल आधीच मजबूत आहे, आता हवाई दल मजबूत होण्याच्या तयारीत आहे. लक्षद्वीपच्या कावरत्ती बेटावर भारतीय नौदलाचा आयएनएस द्विपरक्षक नौदल तळ आहे. कावरत्ती बेटावर नौदल १९८० पासून कार्यरत आहे. भारतीय नौदल येथे पूर्वीपासूनच मजबूत आहे. मात्र आता हवाई दलाची उपस्थिती आणि ताकद वाढवण्याची तयारी सुरू आहे.
हे ही वाचा:
अयोध्येत एकाचवेळी १२००चपात्या बनवणारी मशीन पोहोचली!
‘आप’चा काँग्रेसला दिल्लीतील तीन जागांचा प्रस्ताव!
संरक्षणापासून आरोग्यापर्यंत… भारताने मालदीवशी नेहमीच पाळला शेजारधर्म!
मालदीवप्रकरणी चीनने खुपसले नाक
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीपासून लक्षद्वीप हा चर्चेचा आणि आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे. पर्यटनाला चालना मिळण्याची शक्यता आहे. या वादानंतर इस्रायलनेही या बेटांमधील पर्यटनाला चालना देण्यासाठी पाठींबा दिला आहे. लक्षद्वीपला पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याच्या प्रकल्पावर काम करण्यास पूर्णपणे तयार असल्याचे इस्रायली दूतावासाने सांगितले.