परवाना असलेल्या बारमध्ये मद्यप्राशन करण्याची सोय मुंबईत सर्वत्र आहे. पण प्रभादेवीत रस्त्यावरच मद्यप्राशन करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे की काय, असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे. शेजारच्या वाईन शॉपमधून आपल्या आवडीचे मद्य घ्या आणि रस्त्यावरच प्यायला बसा असा संतापजनक प्रकार त्या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. स्थानिकांमध्ये त्यामुळे अस्वस्थता आहे. न्यूज डंकाने या प्रकाराची दखल घेतली.
फूटपाथवर या दारूड्यांची गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळते. धनमिल नाका येथून सुरू होऊन सयानी रोडपर्यंतच्या फूटपाथवर दारूड्यांनी हे अड्डे थाटले आहेत. यांचा वावर या फूटपाथवर राजरोसपणे सुरू आहे. नागूसयाजीची वाडी येथील कॉर्नरवरील दोन वाइन शॉपमधून हे मद्यपी दारू विकत घेतात. शेजारील फूटपाथवर उभ्याने किंवा रस्त्यावरच बैठका मारून घोळक्याने मिळेल तिथे या मद्याचा आस्वाद घेतला जातो. उघड्यावरच बाटल्यांची झाकणे उघडून मैफिल सजते. रस्त्यावरच बैठका मारून दारूचे पेग रिचवतात. दारूच्या बाटल्या रस्त्यावरच फेकून शिवीगाळ करणे, आरडाओरडा करणे अशा घटना नित्याच्याच झाल्या आहेत. अक्षरशः दारूड्यांची जत्राच इथे भरल्याचे चित्र दिसते.
या दारूपार्ट्यामध्ये आजूबाजूतील जेथे इमारतीच्या कन्स्ट्रक्शनचे काम करणारे त्याचे मजूर, कामगार यांचा समावेश जास्त प्रमाणात असतो. तसेच न्हावा शेवा पुलाच्या सुरू असलेल्या कामासाठी आलेले हे मजूर आणि जोडीला काही स्थानिक मद्यपि बसून रस्त्यावरच मद्याची चव चाखत असतात.
वाइन शॉपच्या फूटपाथवर दारूसोबत चाखण्यासाठी सगळ्या सोईसुविधाच जणू त्यांच्या दिमतीला हजर असतात. नॉनव्हेजपासून व्हेजचे सगळे पदार्थ घेऊन ते दारूसोबत रिचवले जातात. अंडे, भजी, वडा, तंदूरीच्या गाड्य़ा या तळीरामांच्या सेवेला तत्पर असतात. तळीरामांना या फुटपाथवरच दारू आणि चकण्याची व्यवस्था होते. घोळक्याने दारू पिण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अशा पद्धतीने दारू पिण्याला कुणाचा आशीर्वाद आहे, असा सवाल स्थानिकांकडून विचारला जात आहे. पोलिस यंत्रणेचा धाकच राहिला नसल्यामुळे तळीराम मिळेल त्या ठिकाणी बसून दारू ढोसत आहेत. यामुळे महिलांना तसेच मुलींना या मद्यपींचा त्रास सहन करावा लागत आहे, अशी संतप्त भावना स्थानिकांकडून व्यक्त होत आहे. न्यूज डंकाशीही काही लोकांनी आपल्या या भावना व्यक्त केल्या.
या धनमिल नाक्यावर अनेक ऑफिसेस आहेत. येथे नेहमी महिलांची ये-जा असते. ऑफिसेसमधून कर्मचारी या फूटपाथवरूनच जातात. आजूबाजूतील रहिवाशी, लहान मुले जात असताना, अशा वेळेला हे मद्यपी रस्त्यावरच ठाण मांडून बसलेले असतात. मार्गावरून जात असताना नागरिकांना खाली मान टाकून फूटपाथवरून जावे लागत आहे. फूटपाथवरून जाणं-येणं कठीण झालंय, अशा तक्रारी स्थानिक रहिवाशांकडून केल्या जात आहेत. पण यासंदर्भात ना पालिका, ना पोलिस, ना स्थानिक नेते कुणाकडूनही गंभीर दखल घेतली गेलेली नाही.
याबाबत स्थानिक आमदार सदा सरवणकर यांच्याशी न्यूज डंकाने संपर्क साधला असता आम्ही या बाबत तक्रारी अनेक ठिकाणी केल्या आहेत. दादर पोलिस ठाण्यातील जुने डीसीपी होते त्यांनाही याबाबत तक्रार केली होती. लोकांना जाण्या-येण्यास इथून त्रास होतो. महिला बाजारात जातात, माणसे कामावरून सुटतात त्यांना चालणंही कठीण होतं, हे कळल्यानंतर आम्ही तक्रार केली होती. पोलिस स्थानकात याबाबत पत्रव्यवहारही केलेले आहे. त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली होती. परंतु त्यानंतरही ते परत सुरू झालेय, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
घोळक्यांनी दारू पितानाचे हे चित्र आता रोजचेच झाले आहे. एवढी माणसं रोज न चुकता दारूपार्ट्या करत असतात हे पोलिसांना दिसत नाही का, की त्यांच्याकडे कानाडोळा केला जात आहे. हे फूटपाथ दारुड्यांना आंदणच दिलेले आहेत की काय, अशी शंका घेतली जात आहे. पोलिस प्रशासनाने उघड्यावर दारू पिणाऱ्या या दारुड्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. पोलिस यंत्रणेचा यांच्यावर धाक राहायला नाही का. जर स्थानिकांनी यांना विरोध केला आणि त्यातून इथे संघर्ष झाला, मारामाऱ्या झाल्या, महिलांशी छेडछाड झाली तर याला जबाबदार कोण? असा सवाल स्थानिक विचारत आहेत.
यासंदर्भात दादर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश मुगुटराव यांनी प्रतिक्रिया दिली की, या फुटपाथ जवळ वाईन शॉप असल्यामुळे मजूर वर्ग तेथून दारू घेऊन तिथेच बाजूला पीत बसतो, आम्ही त्यांच्यावर वारंवार कारवाई करतो, यासंबधी वाईन्स शॉप मालकांना देखील समज दिली आहे, तसेच उत्पादन शुल्क विभागाला देखील याबाबत कळवले आहे.
हे सगळे स्पष्ट दिसत असतानाही कोणतीही कारवाई का होत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एखादी अघटित घटना इथे घडल्यावरच संबंधितांचे डोळे उघडणार आहेत का, असा प्रश्नही स्थानिक रहिवासी विचारत आहेत. हे प्रकार तात्काळ बंद व्हावेत नाहीतर आम्हाला कठोर पाऊल उचलावे लागेल, असा इशारा आता स्थानिकांकडून दिला जात आहे.