फिरकीच्या जाळ्यात कांगारू फसले; भारताचा डावाने विजय

बॉर्डर-गावस्कर मालिकेत भारताची १-० ची आघाडी

फिरकीच्या जाळ्यात कांगारू फसले; भारताचा डावाने विजय

नागपूरात खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर एक डाव आणि १३२ धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणारा ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या डावात १७७ धावाच करू शकला. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे ते फार काळ टिकू शकले नाहीत. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय भारतीय गोलंदाजांनी चुकीचा ठरवला. तर ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव अवघ्या ९१ धावात आटोपला. ही भारताविरुद्धची कसोटी मालिकेतील दुसरी कमी धावसंख्या ठरली.  १९८१ साली मेलबर्नमध्ये भारताविरुद्ध कांगारूंचा संघ ८१ धावात आटोपला होता.

हेही वाचा :

दिल्ली अबकारी कर घोटाळ्याप्रकरणी काँग्रेस खासदाराच्या मुलाला अटक

ऐतिहासिक करार.. एअर इंडिया खरेदी करणार इतकी विमाने

फक्त ५०० रुपये दिले नाहीत म्हणून केला खून

भारताकडून कर्णधार रोहित शर्माने १२० धावांची शानदार, दमदार शतकी खेळी खेळली. तर अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजाने चिवट फलंदाजी करत हम भी किसीसे कम नही हे दाखवून देत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना सळो की पळो केले. या विजयामुळे भारताने चार कसोटी सामन्याच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.  भारताने तिसऱ्याच दिवशी पहिल्या सामन्यावर विजय मिळवला. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

भारताच्या फिरकीसमोर कांगारू नतमस्तक

ऑस्ट्रेलियन संघाने दोन्हीही डावात भारताच्या फिरकीसमोर शरणागती पत्करली. अश्वीनने दुसऱ्याच षटकात सलामीवीर उस्मान ख्वाजाला तंबूत धाडले. त्यानंतर लाबुशेन आणि वॉर्नर यांनी १९ धावांची भागीदारी करून दुसरा डाव सावरण्याचा केविळवाणा प्रयत्न केला. परंतु ही जोडी फार काळ भारतीय गोलंदाजांसमोर तग धरू शकली नाही. १७ धावा करणारा लबुशेन पुन्हा एकदा रवींद्र जडेजाचा बळी ठरला. त्यानंतर अश्विनने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना फिरकीच्या समोर नाचवले. अश्वीनसमोर ऑस्ट्रेलियन फलंदाजाला फार काळ विकेटवर उभे राहू दिले नाही. त्याने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना एकामागून एक तंबूत धाडलेय. वॉर्नर, पीटर असे एका मागोमाग तंबूत धाडले. अश्विनने  केरीला एलबीडब्ल्यूच्या जाळ्यात अडकवून डावात पाच विकेट्स घेतल्या. एका डावात पाच विकेट्स घेण्याची त्याची ही ३१ वी वेळ.

स्टीव स्मिथ एक बाजू लावून उभा होता, परंतु दुसऱ्या टोकाला संघाची पडझड सुरूच होती. जाडेजाने पॅट कमिन्सला बाद करत ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का दिला. अक्षर पटेलने मर्फीला तंबूत धाडून पहिली विकेट घेतली. यानंतर शमीने लायनला बोल्ड केले. शमीने बोलैंडला बाद करत ऑस्ट्रेलियाचा डाव संपवला. स्मिथ दुसऱ्या टोकाला २५ धावा करून नाबाद राहिला. भारताच्या गोलंदाजीच्या दुसऱ्या डावात आर अश्विनने ५ विकेट्स घेऊन ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ माघारी धाडला, तर रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी २ विकेट्स तसेच अक्षर पटेलने १ विकेट घेतली.

रवींद्र जडेजाला दंड

रवींद्र जडेजाला नागपूरमधील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीदरम्यान ICC आचारसंहितेच्या स्तर 1 चे उल्लंघन केल्याबद्दल त्याच्या मॅच फीच्या २५% दंड ठोठावण्यात आला आहे. रवींद्र जडेजाने कलम २.२० चे उल्लंघन केले आहे. जे खेळाच्या भावनेच्या विरुद्ध मानले जाते. पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या ४६व्या षटकात जडेजा त्याच्या बोटावर क्रीम लावताना दिसला. सिराजच्या हातावरून क्रीम घेत असताना आणि डाव्या बोटावर घासताना व्हिडिओमध्ये दिसत आहे.  त्यानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेटर आणि मीडियाने त्याच्यावर बॉल टॅम्परिंगचा आरोप केला.

Exit mobile version