मुंबई- काळाचौकी परिसरातील पालिकेच्या शाळेत सिलेंडर्सचा स्फोट!

सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

मुंबई- काळाचौकी परिसरातील पालिकेच्या शाळेत सिलेंडर्सचा स्फोट!

मुंबईमधील काळाचौकी परिसरातील मुंबई महानगरपालिकेच्या बंद पडलेल्या शाळेत ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाला आहे.ऑक्सिजन सिलेंडरच्या स्फोटामुळे आग लागली.६ ते ७ ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे.अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मात्र,सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये.

काळाचौकी मिंट कॉलनी परिसरात असलेल्या मुंबई महापालिकेच्या साईबाबा पथ संकुल शाळेमध्ये हा स्फोट झाला.सहा ते सात ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाल्याचे वृत्त आहे. अचानक स्फोट झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.या आगीवर आता अग्निशमन दलाने नियंत्रण मिळवले असून आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

ही शाळा मागील तीन वर्षापासून बंद होती. अतिधोकादायक इमारत असल्यामुळे शाळा बंद होती. कोविड काळाता लसीकरण केंद्र म्हणून या शाळेचा वापर करण्यात आला होता.त्यानंतर या ठिकाणी ऑक्सिजन सिलेंडर आणि गाद्या ठेवण्यात आल्या होत्या.याच ऑक्सिजन सिलेंडर टाक्यांचा स्फोट झाला आणि आग लागली.

हे ही वाचा..

घरची माणसं टिकेनात; चालले ‘भारत जोडो’ला!

दीड वर्षापूर्वी सुईही टोचली नाही आणि टाकाही नाही

नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदेंचे हात बळकट करण्यासाठी काम करणार

चिनी ड्रॅगनच्या वेटोळ्यात मालदीवचे वाटोळे!

दरम्यान ठाकरे गटाचे पदाधिकारी अनिल कोळी यांनी घटनास्थळी भेट दिली.ते म्हणाले की, बीएमसीची ही शाळा तीन-चार वर्षांपासून बंद होती. या शाळेतील विद्यार्थी इतर विभागात पाठवले गेले होते. त्यानंतर ही शाळा तोडण्याचं काम सुरू केलं होतं. परंतु काही दिवसानंतर तोडण्याचं काम बंद करण्यात आलं. कोविड काळाता लसीकरण केंद्र म्हणून या शाळेचा वापर करण्यात आल्याचे ठाकरे गटाचे पदाधिकारी अनिल कोळी यांनी सांगितलं.

दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवली आहे. आगीच्या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र बंद शाळेतील सिलेंडरचा स्फोट नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही.

Exit mobile version