मन हेलावून टाकणारी घटना; चार महिन्यांचे बाळ नाल्यात वाहून गेलं

ठाकुर्ली स्थानकानजीकची घटना 

मन हेलावून टाकणारी घटना; चार महिन्यांचे बाळ नाल्यात वाहून गेलं

मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते डोंबिवली पर्यंत वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरू असून डोंबिवली आणि कल्याणपुढील स्थानकांपर्यंतची वाहतूक ठप्प झाली आहे. रेल्वे रुळावर पाणी साचल्याने वाहतूक कोलमडली आहे. यातच डोंबिवलीपुढील ठाकुर्ली स्थानकानजीक एक दुर्दैवी घटना घडली आहे. चार महिन्याचे बाळ वाहून गेल्याची मन  हेलावून टाकणारी घटना घडली आहे.

अंबरनाथच्या दिशेने जाणारी एक लोकल ठाकुर्लीजवळ दोन तास थांबली होती. यावेळी पुढील प्रवास चालत करावा या उद्देशाने एक महिला तिच्या चार महिन्याचे बाळ आणि काकांसह रेल्वे ट्रॅकवर उतरली. त्यावेळी त्या काकाच्या हातून बाळ निसटलं आणि ते वाहत्या पाण्यात पडलं. दुपारी ३ वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. चार महिन्याचं बाळ निसटलं तेव्हा बाजूलाच नाला असल्याने ते बाळ त्या नाल्यातील वाहत्या पाण्यात पडलं.

मुंबईसह परिसरात आज मुसळधार पाऊस पडल्याने मध्य मार्गावरील वाहतूक कोलमडली. त्यामुळे सीएसटीएम ते डोंबिवली दरम्यान लोकल सुरू होत्या. त्याच्या पुढील लोकल बंद करण्यात आल्या आहेत. दरम्यान, या ठिकाणी कल्याण लोहमार्ग पोलिस दाखल झाले असून त्यांनी शोध सुरू केला आहे. हा नाला ज्या ठिकाणी आहे तो नाला पुढे जाऊन खाडीला मिळतो. या दुर्दैवी घटनेनंतर आता प्रवाशांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा:

सरकारला घटनाबाह्य म्हणणारे उद्धव ठाकरे अजित पवारांच्या भेटीला

जनतेचा एकच पुकार, देशात पुन्हा मोदी सरकार

जगविख्यात मराठमोळे शरीरसौष्ठवपटू आशिष साखरकर यांचे निधन

भागवत कराड घेणार सात कोटींचे घर

दरम्यान, पुढील ४८ तासात मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे राज्यभरात ज्या ठिकाणी पूर परिस्थितीची शक्यता आहे त्या ठिकाणी एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहेत.

Exit mobile version