महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ चा निकाल लागला आहे. या परीक्षेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्याने बाजी मारली आहे. विनायक पाटील यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. विनायक पाटील यांनी ६२२ गुण पटकावत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. मुलींमध्ये पूजा वंजारी हिने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर मागासवर्गीय प्रवर्गातून धनंजय बांगर राज्यातून पहिले आहेत.
एमपीएससीने सर्वसाधारण गुणवत्ता यादी आणि संबंधित माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध केली. राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ विविध २३ संवर्गातील ६१३ पदांसाठी घेण्यात आली होती. राज्यसेवेची आतापर्यंतची सर्वाधिक पदांची भरती प्रक्रिया असल्याने राज्यभरातील उमेदवारांचे या निकालाकडे लक्ष लागले होते. यादीमध्ये एकूण १ हजार ८३० उमेदवारांचा समावेश आहे.
राज्य मुख्य परीक्षा २०२२ च्या निकालात यंदा कोल्हापूर जिल्ह्याने बाजी मारली. उपजिल्हाधिकारी, डिवायएसपी आणि तहसीलदार या संवर्गातील जागांसाठी ही भरती प्रक्रिया घेण्यात आली होती. १८ जानेवारी २०२३ रोजी परीक्षेनंतर निवड झालेल्या उमेदवारांची मुलाखत झाली होती. त्याच दिवशी काही तासातच अंतिम निकाल जारी करण्यात आला. या मुलाखतीनंतर त्याची अंतिम यादी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे.
परीक्षेतील पदांसाठी पसंतीक्रमाचे पर्याय सादर करण्यासाठीची प्रक्रिया २२ जानेवारीपासून सुरू करण्यात येणार आहे. अधिसूचित संवर्ग-पदांसाठी १ ते २३ यातील पसंतीक्रम निवडणाऱ्या उमेदवारांचा त्यांनी दिलेल्या पसंतीक्रमानुसार सर्व पदांवरील निवडीसाठी विचार होईल.
हे ही वाचा:
इराणची पाकिस्तानमध्ये घुसून कारवाई; दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त
माजी सैनिकाची अनोखी रामभक्ती; ७ कोटी वेळा लिहिले ‘श्री राम’
विराट कोहलीला राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लेपाक्षीच्या वीरभद्र मंदिराला दिली भेट
विनायक पाटील हे कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील मुदाळ येथील आहेत. विनायक पाटील यांचे वडील शेती करतात. त्यांनी राज्यसेवेच्या दुसरा प्रयत्नात हे उल्लेखनीय यश मिळवले आहे. पहिल्या प्रयत्नातून उपशिक्षणाधिकारी पदासाठी त्यांची निवड झाली होती. त्याचे शिक्षण पुणे येथील फर्ग्रसन महाविद्यालयात झाले असून संख्याशास्त्र विषयात त्यांनी पदवी मिळवली आहे.