मुंबईतील गजबजलेला परिसर म्हणून ओळख असणाऱ्या लालबागमध्ये भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. बेस्ट (BEST) बसच्या झालेल्या या अपघातात नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. बेस्टच्या ६६ क्रमांकाच्या बसला हा अपघात झाला. बस लालबागमध्ये असताना बसमधून प्रवास करणाऱ्या एका मद्यधुंद प्रवाशाने ड्रायव्हरसोबत झटापट करत स्टेअरिंग हिसकावून घेतलं आणि त्यामुळे बस अनियंत्रित होऊन हा अपघात झाल्याची माहिती आहे. ही घटना रविवारी रात्री घडली.
माहितीनुसार, बेस्टची ६६ क्रमांकाची बस राणी लक्ष्मी चौकच्या दिशेने जात होती. कमलेश प्रजापती (वय ४० वर्षे) हे बसचे चालक होते. गणेश टॉकीजच्या दरम्यान एका दारुड्या प्रवाशाने चालकाबरोबर हुज्जत घालण्यास सुरुवात केली. यानंतर झालेल्या झटापटीत त्याने स्टेअरिंग हिसकावून घेतलं. त्यामुळे अचानक वाहकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि बस अनियंत्रित होऊन फुटपाथच्या दिशेनं गेली. या दरम्यान, बसची पादचारी, कार आणि दुचाकींना धडक बसली. यात नऊ जण जखमी झाले आहेत. यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमींना शहरातील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
हे ही वाचा:
आप आमदार अमानतुल्ला खान यांच्या घरावर ईडीचा छापा
बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव यांच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाची तुलना तरी होईल का?
विद्यार्थ्यांना पारंपारिक वेशभूषा, वस्तू वापरावर बंदी आणल्यास होणार कारवाई
अर्णब गोस्वामीप्रमाणे बंगालमध्येही पत्रकाराची मुस्कटदाबी?
घटनेची माहिती मिळताच काळाचौकी पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलिसांनी बसमधील दारुड्या प्रवाशाला ताब्यात घेतलं आहे. दत्ता मुरलीधर शिंदे (वय ४० वर्षे) असे आरोपीचे नाव आहे. त्यासोबतच, वाहक आणि चालक यांना काळाचौकी पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. चौकशीनंतर योग्य ती कायदेशीर कारवाई होणार असल्याची माहिती आहे.