ज्येष्ठ उद्योगपती, पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनानंतर देशभरात शोककळा पसरली आहे. मुंबईतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यानंतर रतन टाटा यांच्या सन्मानार्थ राज्यात गुरुवार, १० ऑक्टोबर रोजी एक दिवसाचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचना केल्या आहेत.
उद्योगपती रतन टाटा यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यासाठी श्रद्धांजली म्हणून एक दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. या काळात राज्यातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येतील तसेच मनोरंजन किंवा करमणुकीचे कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत. रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.
पद्मविभूषण, प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे निधन झाले आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी वयाच्या ८६व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या निधनाच्या वृत्तामुळे उद्योग विश्वासह संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. रतन टाटा हे नियमित तपासणीसाठी ७ ऑक्टोबर रोजी तपासणीसाठी रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांनी याची माहिती सोशल मीडियावरून दिली होती. मात्र काही तासातच त्यांची प्रकृती खालावली. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. रतन टाटांच्या निधनाचं वृत्त प्रसिद्ध होताच अनेक नेत्यांनी व कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. रतन टाटा यांच्या निधनाचे वृत्त प्रसिद्ध होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
हे ही वाचा :
पद्मविभूषण रतन टाटा यांचे निधन
एटीएसची रत्नागिरीत मोठी कारवाई, पाच संशयिताना अटक
उत्तरप्रदेशमधील तरुणीवर मुंबईत लैंगिक अत्याचार
ज्ञानेश महारावांची चरबी उतरवली!
२८ डिसेंबर १९३७ रोजी मुंबईत जन्मलेले रतन टाटा उद्योगांसह सामाजिक क्षेत्रातही काम करत आहेत. रतन टाटा यांच्याकडे एक खरे देशभक्त म्हणून पाहिलं जायचं. रतन टाटा यांनी मार्च १९९१ ते डिसेंबर २०१२ या काळात टाटा समूहाचे नेतृत्व केले. टाटा समूहाला त्यांनी यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचवलं. केवळ उद्योगच नव्हे तर रतन टाटा हे त्यांच्या परोपकारी कार्यासाठीही जगभर प्रसिद्ध आहेत.