रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या आयआयडीएल उपक्रमातील विद्यार्थ्यांनी व्हॅलेंटाईन डे निमित्त आयोजित केलेल्या ‘अ डेट विथ द बीच’ या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. या उपक्रमा अंतर्गत भायंदर जवळील गोराई समुद्र किनाऱ्याची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती. प्रसिद्ध लेखक आणि गीतकार मनोज मुंतशीर यांची विशेष उपस्थिती लाभली होती.
दरवर्षी तीनशे दशलक्ष टनांहून अधिक कचरा हा समुद्रात सोडला जातो. प्लॅस्टिकच्या कचऱ्यामुळे समुद्री जीवसृष्टी खूप मोठ्या प्रमाणात धोक्यात आली आहे. समुद्री कचऱ्यातला ऐंशी टक्के कचरा हा प्लॅस्टिकचा कचरा आहे. समुद्री जीवसृष्टीचा श्वास कोंडल्या गेल्यामुळे आणि ती मृतावस्थेत गेल्यामुळे त्याचा थेट परिणाम मानवाच्या आरोग्यावर होत आहे. त्याबद्दल नुसती चिंता करणे पुरेसे नसून ठोस कृती करणे गरजेचे आहे. याच विचारतवून आयआयडीएल च्या विद्यार्थ्यांनी व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने गोराई समुद्र किनाऱ्याची सफाई करण्याचा उपक्रम हाती घेतला. त्यांच्या या उपक्रमाला नागरिकांनी भरगोस प्रतिसाद दिला असून मनोज मुंतशीर यांची विशेष उपस्थिती लाभली.
आयआयडीएल चे २६ विद्यार्थी आणि १०० पेक्षा अधिक स्वयंसेवकांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता. या प्रसंगी बोलताना “जर ह्या भूमीला आपण आपली आई मानतो तर ती स्वच्छ करण्यात लाज का वाटली पाहिजे.” असे मत मनोज मुंतशीर यांनी व्यक्त केले.