मलबार हिल येथील १३६ वर्षे जुन्या हँगिंग गार्डन परिसरातील जलाशयाची क्षमता वाढवण्यासाठी पुनर्बांधणी करण्याचा मुंबई महानगरपालिकेतर्फे प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या प्रस्तावासंदर्भात नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यातर्फे मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात जनसभेचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत त्यांनी नागरिकांची समिती गठित करण्याचे निर्देश दिले.
प्रशासनातर्फे महत्वाचे निर्णय घेत असताना नागरिकांचा देखील त्यामध्ये सहभाग असावा, प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार असावा या उद्देशाने मंत्री लोढा यांनी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीसाठी अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू, अभिनेत्री जुही चावला, मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, नागरिक उपस्थित होते.
हेही वाचा..
कांदळवन क्षेत्रात अतिक्रमण होणार नाही याची काळजी घ्या
रुग्णालयाच्या निष्काळजीपणाचा फटका हवाई दल अधिकाऱ्याला; सर्वोच्च न्यायालयाने ठोठावला १.५४ कोटींचा दंड
गैरसोय टाळण्यासाठी कांदा खरेदी तातडीने सुरू करा
भाजपा अध्यक्ष नड्डा आरती करताना मोठी दुर्घटना टळली !
मंत्री लोढा यांनी प्रशासनासह काम करण्यासाठी नागरिकांची एक समिती स्थापन करण्याविषयी निर्देश दिले. जेणेकरून नागरिक सुद्धा या प्रक्रियेत सहभागी होऊ शकतील. प्रशासनात पारदर्शकता असावी, यादृष्टीने नागरिकांचा सहभाग अतिशय आवश्यक असल्याने या समितीची भूमिका महत्वाची ठरेल. नागरिकांच्या समस्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडलेल्या असल्याचे मंत्री लोढा यांनी सांगितले. मंत्री लोढा म्हणाले की, “या जलाशयासाठी दुसरी जागा शोधण्याबाबत मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांशी बोललो आहे. नागरिकांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी आमचे सर्व प्रयत्न सुरु असून, नक्कीच त्यातून जनहिताचा तोडगा निघेल. याबाबत पुढील कार्यवाही करताना नागरिकांचा सहभाग सुद्धा महत्वाचा ठरेल, असेही त्यांनी सांगितले.