लोकसभा निवडणूक मतमोजणीच्या दिवशी दिनांक ४ जून, २०२४ रोजी उबाठा गटाचे विधान परिषद आमदार विलास पोतनीस यांच्यावर शस्त्रधारी पोलीस संरक्षकासह मतमोजणी केंद्रात प्रवेश केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी(१६ जून) रात्री उशिरा वनराई पोलीस ठाण्यात विलास पोतनीस यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदार संघात महायुतीकडून रविंद्र वायकर यांनी निवडणूक लढवली होती. ४ जून रोजी नेस्को सेंटर येथे मतमोजणी पार पडली. मतमोजणीच्या दिवशी ज्यांना ज्यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फत अधिकृत ओळखपत्र देण्यात आली होती, त्यांनाच मतमोजणी केंद्रात प्रवेश देण्यात येत होता.
हे ही वाचा:
मुंबईतील ६० हॉस्पिटलांना धमकीचे ईमेल!
ईव्हीएम हॅकचे खोटे आरोप करणाऱ्या राहुल गांधी, आदित्य ठाकरेंनी माफी मागावी
बकरी ईदला लज्जास्पद कृत्य, बळीच्या बोकडावर लिहिले ‘राम’
जम्मू-काश्मिरातील रियासी हल्ल्याची तपासणी एनआयएच्या हाती!
मात्र मतमोजणीची प्रक्रिया सुरु असताना विधानपरिषदचे सदस्य विलास पोतनीस यांनी आपल्या शस्त्रधारी पोलीस वर्दीतील अंगरक्षकासह मतमोजणी केंद्रात सायंकाळी ४.०० ते ८.०० या दरम्यान प्रवेश केला. त्यांच्यासोबत उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी मतमोजणी केंद्रात प्रेवश केला होता. याबाबत रविंद्र वायकर यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती.
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार ज्या व्यक्तीकडे निवडणूक निर्णय अधिका-यांनी दिलेले प्रवेशाचे ओळखपत्र नसेल त्यांना प्रवेश देण्यात येऊ नये, असे स्पष्ट निर्देश असताना अमोल कीतर्किर आणि विलास पोतनीस यांनी निवडणूक आयोगाच्या नियमावलीचा भंग करत मतमोजणी केंद्रात प्रवेश केला. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी रविंद्र वायकर यांनी केली. त्यांच्या तक्रार अर्जाची दखल घेऊन वनराई पोलीसांनी विलास पोतनीस यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.