दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर २४ वर्षांच्या मुलाला अटक करण्यात आली. हा तरुण ६७ वर्षांचा वृद्ध असल्याचे भासवून कॅनडाला जाण्याच्या प्रयत्नात होता. त्याच्याकडून बनावट पासपोर्टही जप्त करण्यात आला आहे. १८ जून रोजी प्रोफायलिंग आणि बिहेविअर डिटेक्शनच्या आधारे सीआयएसएफच्या जवानाने टर्मिनल ३च्या चेक-इन विभागात एका प्रवाशाला रोखण्यात आले.
चौकशीत त्याने स्वतःची ओळख रशविंदर सिंह सहोता (६७) अशी सांगितली. पासपोर्टवर त्याची जन्मतारीख १०.०२.१९५७ आणि पीपी नंबर ४३८८५१ आणि भारतीय असल्याचे नमूद केले होते. तो एअर कॅनडाच्या विमानातून उड्डाण करणार होता. मात्र पासपोर्ट नीट पडताळून पाहिला असता, त्याचे वय पासपोर्टमध्ये नमूद केलेल्या वयापेक्षा खूप कमी दिसत होते. त्याचा आवाज आणि त्वचाही एखाद्या तरुण व्यक्तीप्रमाणे होती. हे वर्णन पासपोर्टच्या विवरणाशी जुळत नव्हते. नीट बारकाईने पाहिल्यावर असे दिसले की, त्याने त्याचे केस आणि दाढी सफेद रंगाने रंगवली आहे आणि वृद्ध दिसावे यासाठी चष्मा परिधान केला आहे.
हे ही वाचा..
तामिळनाडूत विषारी दारू प्यायल्याने २५ जणांनी गमावला जीव
हरमन, स्मृतीची शतके; थरारक सामन्यात शेवटच्या चेंडूवर भारताची दक्षिण आफ्रिकेवर मात
१४ खरिप पिकांना केंद्राकडून किमान आधारभूत किंमत जाहीर; दीडपट मोबदला मिळणार
ऐतिहासिक दोन शतकानंतर गोलंदाजीतही स्मृती मंधानाची कमाल
संशय आल्यानंतर त्याची सखोल तपासणी करण्यात आली. त्याच्या मोबाइलची तपासणी केल्यानंतर त्यात पासपोर्टची एक प्रत दिसली. त्यात पासपोर्ट नंबर दुसरा होता आणि त्यावर गुरुसेवकसिंग वय २४ वर्षे (जन्मतारीख १०.०६.२०००) असे लिहिले होते. बनावट पासपोर्ट तयार करण्यात आल्याचे उघड झाल्यामुळे त्याला आता पुढील चौकशीसाठी दिल्ली पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.