दुगारवाडी धबधब्यात १७ वर्षीय तरुण गेला वाहून

वन विभागाकडून शोध सुरू

दुगारवाडी धबधब्यात १७ वर्षीय तरुण गेला वाहून

नाशिकच्या दुगारवाडी धबधबा परिसरात एक तरुण वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. सुट्टी आणि पावसानिमित्त पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी झालेली पाहायला मिळाली होती. अशातच रविवार, १६ जुलै रोजी दुगारवाडी धबधब्यात एक जण वाहून गेला आहे. रविवारी दुपारी उशिरा ही घटना घडली असून वन विभागासह पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.

त्र्यंबकेश्वर जवळील काचूर्ली परिसरात दुगारवाडी धबधबा आहे. पावसाला जोरदार सुरुवात झाल्यामुळे पर्यटकांची या ठिकाणी गर्दी असते. रविवारीही पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येत होती. दुपारी ४ वाजेच्या दरम्यान नाशिकच्या देवळाली कॅम्प येथील १७ वर्षीय अमित शर्मा हा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली. त्यानंतर वन विभागाकडून संध्याकाळी ७.३० पर्यंत या तरुणाचा शोध सुरू होता. मात्र, रात्री उशिरा अंधारामुळे अडथळा येत असल्याने शोध थांबवण्यात आला. पुन्हा सोमवार, १७ जुलै रोजी सकाळी पाच वाजेपासून शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. अद्याप या तरुणाचा शोध लागलेला नाही.

हे ही वाचा:

आयएसआयला मदत करणाऱ्याला उत्तर प्रदेशातून अटक

आशियाई ऍथलीट्स चॅम्पियनशिपमध्ये पदकतालिकेत भारत तिसरा

असभ्य भाषेची राऊत यांना आता शरम वाटू लागली…

जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला, हंडवारामध्ये ३३ वर्षांनी उघडली चित्रपटगृहे

त्र्यंबकेश्वरसह परिसरात पावसामुळे नदी, धबधबे वाहू लागले आहेत. त्र्यंबकेश्वर जवळील दुगारवाडी धबधबा देखील ओसंडून वाहू लागल्याने पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. शनिवार- रविवारी आठवड्याच्या शेवटी मोठ्या प्रमाणावर नाशिकसह राज्यभरातील पर्यटक जुगारवाडी धबधब्याला भेट देत असतात. अनुचित प्रकार घडू नये, म्हणून शनिवारीच पोलिसांकडून येथील पर्यटकांना सूचना करण्यात आल्या होत्या, मात्र, रविवारी पर्यटकांची गर्दी होऊन दुपारी चार वाजायच्या सुमारास नदीचे पाणी वाढल्याने हा अपघात घडला.

Exit mobile version