आजपासून उदगीरमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

आजपासून उदगीरमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

आज, २२ एप्रिलपासून लातूर येथील उदगीरमध्ये ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात होणार आहे. आजपासून तीन दिवस हे साहित्य संमेलन चालणार असून तिन्ही दिवस राज्यभरातील वाचक आणि रसिक या मेळाव्याचा आस्वाद घेऊ शकणार आहेत. जेष्ठ साहित्यिक भारत सासणे हे यंदाच्या संमेलनाचे अध्यक्ष असणार आहेत.

लातूरमधील उदगीर येथे ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २२, २३ आणि २४ एप्रिल रोजी पार पडणार आहे. उदगीर येथील उदयगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणात हे संमेलन होणार आहे.

साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशी सकाळी ७.३० ते १० यावेळेत ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. यावेळी ग्रंथपूजन संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांच्या हस्ते होणार असून ग्रंथदिंडी महत्त्वाच्या मार्गांवरून संमेलनस्थळी दाखल होणार आहे. त्यानंतर विविध दालनांचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडेल.

मुख्य उद्घाटन सोहळ्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हजर, शिवराज पाटील चाकूरकर, अशोक चव्हाण, सुभाष देसाई उपस्थित राहणार आहेत. यानंतर दिवसभर विविध विषयांवरील परिसंवाद पार पडणार आहेत. संध्याकाळी लोककला सादरीकरण होणार आहे.

संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी जेष्ठ साहित्यिक राजन गवस यांची मुलाखत आणि विविध विषयांवर परिसंवाद होणार आहेत. गझल कट्टा आणि कवी कट्याचा कार्यक्रम पार पडणार आहे. तसेच बालकवी संमेलन आणि बाल कथाकथनचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. उदगीर हे कर्नाटक आणि तेलंगणाच्या सीमेवर असल्यामुळे या भागातील निमंत्रीत कवींचे काव्यवाचन होणार आहे.

हे ही वाचा:

सिग्नलला फडका बांधून देवगिरी एक्स्प्रेसवर दरोडा

सर्वोच्च न्यायालयात सगळेच वकील म्हणाले, जहांगीरपुरीमध्ये अतिक्रमणे!

पनवेलचा सागर म्हात्रे ठरला पहिला मराठी इंडियन आयडॉल

जातीयवादाचे विद्यापीठ शरद पवार

साहित्य संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी सीमावर्ती भागातील मराठी भाषिकांच्या प्रश्नांवर चर्चासत्र, कवी कट्टा, गझल कट्टा आणि बालकांसाठी बालकांनी बनवलेल्या कथा आणि कविता वाचन होणार आहे. संध्याकाळी अवधूत गुप्ते यांचा गाण्यांचा कार्यक्रम सादर होणार आहे.

Exit mobile version