शाळेसाठी कुटुंबापासून दूर राहिलेल्या नऊ वर्षांच्या मुलाने त्याचे १२ जणांचे कुटुंब गमावले असण्याची भीती व्यक्त होत आहे. इर्शाळवाडीवर दरड कोसळल्याची घटना घडल्यानंतर त्याचे १२ कुटुंबीय अद्याप सापडलेले नाहीत. हा मुलगा आपल्यावर काय आपत्ती कोसळली आहे, याबाबत अद्याप अनभिज्ञ आहे. वसंत पिरकड असे या मुलाचे नाव आहे. तो कर्जत येथील आदिवासी मुलांसाठी असलेल्या आश्रमशाळेत राहतो. दरडीची घटना घडली तेव्हा त्याच्या एका नातेवाइकाने त्याला खालापूर येथे आणले आहे.
चौथीत शिकणाऱ्या वसंतने गणपतीचे चित्र असलेले टी-शर्ट आणि निळ्या रंगाची पँट घातली होती आणि तो शांतपणे आजूबाजूला पाहात होता. त्याला काय घडले आहे, हे अद्याप पूर्णपणे समजलेले नाही. तो शांतपणे मदत शिबिरात काय चालले आहे, हे पाहात होता. पण त्याने एक शब्दही उच्चारला नाही.
वसंत गेल्या चार वर्षांपासून मांगवाडी आश्रमशाळेत राहतो आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत तो इर्शाळवाडीला परत येतो. इथे त्याचा महिनाभर मुक्काम असायचा. एका गावकर्याने त्याला विचारले की, तो त्याच्या आई-वडिलांना शेवटचा कधी भेटला होता, तेव्हा त्याला काहीच आठवत नव्हते. तो असाच खालचा ओठ चावत उभा राहिला. त्याचे वडील मधु पिरकड यांचा मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढल्याची माहिती शनिवारी पहाटे अधिकाऱ्यांनी दिली. मात्र हे त्या मुलाचे वडील नसल्याचे स्पष्ट झाले. तो मृतदेह तेच नाव असलेल्या दुसऱ्या व्यक्तीचा होता. शनिवारी सायंकाळी उशिरापर्यंत त्याची आई दुगी व इतर बेपत्ता होते.
हे ही वाचा:
कुस्ती चाचण्यांमधून सवलत प्रकरणात उच्च न्यायालयाचा हस्तक्षेप नाही, पंघल राखीव
पाकिस्तानच्या सीमा हैदरला हवे भारतीय नागरिकत्व !
इर्शाळवाडीतील दरडग्रस्त अनाथ मुलांना डॉ. गोऱ्हे यांनी दिला दिलासा
कुटुंब रंगलंय गप्पात! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कुटुंबाची पंतप्रधान मोदींनी केले आस्थेवाईक चौकशी
पनवेल येथील रहिवासी असलेल्या मुलाची मावशी माई कांबडे यांनी शनिवारी या मुलाला खालापूर येथील नडाळ गावामधील श्री क्षेत्र पंचायतन मंदिरातील तात्पुरत्या निवाऱ्यात आणले होते. एनडीआरएफच्या पथकाने घटनास्थळी मदतकार्य सुरू केले आहे. त्यांना ढिगाऱ्यातून सापडलेल्या मौल्यवान वस्तू आणि दागिने नियंत्रण कक्षात तैनात असलेल्या स्थानिक पोलिसांकडे देण्यात आले होते. मात्र ढिगाऱ्यातून जप्त केलेली कुटुंबीयांची रोकड आणि सोने त्यांना दिले नाही, असा आरोप माई कांबडे आणि तिच्या दोन नातेवाईकांनी केला. त्यानंतर बदलापूर येथील एका नातेवाइकाने त्यावर केलेल्या दाव्यानुसार तो शुक्रवारी संध्याकाळी सर्व मौल्यवान वस्तू घेऊन निघून गेला, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. तसेच, त्यांच्या तीन दुचाकीही गायब असल्याचे त्यांनी सांगितले. जवळपास कोणतीही बँक नसल्यामुळे या १३ जणांच्या कुटुंबाने त्यांची रोकड आणि सोने घरात ठेवले होते.
तिघा बहिणींनी गमावले सात जणांचे कुटुंबीय
राधिका पारधी (१२), मोनिका (९) आणि माधुरी (४) या तीन बहिणींनी सात कुटुंबीय गमावले आहेत. राधिका आणि मोनिका या माथेरानमधील जुमापट्टी येथील आदिवासी आश्रमशाळेत राहात होत्या. तर, सर्वांत छोटी मुलगी इर्शाळवाडीची घटना घडण्याच्या काही दिवसांपूर्वी कर्जतला नातेवाइकांकडे गेली होती. त्यांचे आईवडील, आजी-आजोबा, दोन काका आणि एक काकी बेपत्ता आहेत.
या मुलींना त्यांची आत्या गंगू पुजारी (३०) हिने खालापूरला आणले. राधिका सातवीत तर मोनिका चौथीत शिकते. माधुरी अजून शाळेत जात नाही. राधिका गेल्या वर्षी मे महिन्यात घरी आली होती, तेव्हा ती आणि माधुरीसह सर्व कुटुंबीयांसोबत राहिली. त्यानंतर जूनमध्ये शाळा सुरू होताच त्या आश्रमशाळेला परतल्या. त्यांचे वडील पपू आणि आई रंजना त्यांना भेटण्यासाठी जून महिन्यात शाळेत आल्या होत्या. ते त्यावेळी सुमारे तासभर आमच्या शाळेत होते. आता मात्र ते कुठे आहेत, काहीच कळत नाही, असे सर्वांत मोठी मुलगी राधिकाने सांगितले.
घटनास्थळी हजर असलेल्या कोणातही त्यांना खरे काय घडले, ते सांगण्याचे धाडस नाही. ‘आम्ही दोघी आश्रमशाळेत शिकतो. आम्ही आज इथे आलो तेव्हा आमच्या लहान बहिणीला भेटलो. पण आम्ही आल्यापासून माधुरी झोपलेलीच आहे. त्यांचे आईवडील कुठे आहेत, याची त्यांना काहीच कल्पना नाही. आमच्या वाडीतले गावकरी येथे आहेत. मात्र आमच्या घरातले कोणीच दिसत नाही,’ असे माधुरीने सांगितले.
तर, या दुर्घटनेमुळे अनाथ झालेली मुले, वाचलेले कुटुंबीय आणि त्यांचे नातेवाईक यांची माहिती महसूल विभाग गोळा करत आहे. जे अनाथ झाले आहेत, त्यांना योग्य ती मदत केली जाईल आणि त्यांची काळजी घेतली जाईल, अशी ग्वाही आदिवासी विभागाचे प्रदीप सोलसकर यांनी दिली.