करोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रोनचा प्रसार किती प्रमाणात झाला आहे याची पडताळणी करण्यासाठी केलेल्या चाचणीतून आकडेवारी समोर आली आहे. पडताळणी करण्यासाठी केलेल्या आठव्या चाचणीचे निष्कर्ष पालिकेच्या आरोग्य विभागाने जाहीर केले आहेत. या आठव्या फेरीतील चाचण्यांसाठी ३७३ नमुन्यांची चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी ८९ टक्के नमुने हे ओमायक्रोन बाधित असल्याचे समोर आले आहे.
चाचणीसाठी ३७३ नमुने घेण्यात आले होते. यापैकी २८० नमुने मुंबई महापालिका क्षेत्रातील होते, तर उर्वरित नमुने मुंबई मनपा क्षेत्राबाहेरील होते. मुंबईतील २८० नमुन्यांपैकी ८९ टक्के म्हणजेच २४८ नमुने हे ‘ओमायक्रोन’ बाधित असल्याचे समोर आले आहे. २१ नमुने म्हणजेच ८ टक्के नमुने हे ‘डेल्टा डेरिव्हेटिव्ह’ या व्हेरियंटने, तर उर्वरित सुमारे ३ टक्के म्हणजेच ११ नमुने हे इतर व्हेरियंटचे असल्याचे आढळून आले आहे.
‘कोरोना १९’ विषाणूचे जिनोम सिक्वेंसिंग हे ऑगस्ट २०२१ पासून नियमितपणे करण्यात येत आहे. ही चाचणी केल्यामुळे एकाच विषाणूच्या दोन किंवा अधिक प्रजातींमधील फरक ओळखून येतो. त्यामुळे योग्य ते उपचार करणे शक्य होते.
हे ही वाचा:
रेल्वेचालक अडीच तास निवांत झोपला आणि गाडी लेट झाली!
व्हाय आय किल्ड गांधी चित्रपटावर बंदीची मागणी
शेअर बाजारात झोमॅटो, नायकाची झाली घसरण…
कर्नाटकच्या शाळेत नमाज पढण्याचे प्रकरण तापले… हिंदू संघटनांचे चौकशीचे आदेश
मुंबईतील चाचणी केलेल्या २८० रुग्णांपैकी ३४ टक्के म्हणजेच ९६ रुग्ण हे २१ ते ४० या वयोगटांतील आहेत. तर २८ टक्के म्हणजेच ७९ रुग्ण हे ४१ ते ६० या वयोगटातील आहेत. २५ टक्के म्हणजेच ६९ रुग्ण हे ६१ ते ८० या वयोगटांतील आहेत. ८ टक्के म्हणजेच २२ रुग्ण हे ० ते २० या वयोगटांतील; तर ५ टक्के म्हणजे १४ रुग्ण हे ८१ ते १०० या वयोगटांतील आहेत. हे सर्व नमुने ‘ओमायक्रोन’ या करोना विषाणुच्या व्हेरियंटने बाधित असल्याचे आढळून असून या रुग्णांना करोनाची कोणतीही गंभीर लक्षणे दिसून आली नाहीत.