भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना सोमवार, १५ ऑगस्ट रोजी कराड तालुक्यात असलेल्या येणके गावाने एक क्रांतिकारी आणि कौतुकास्पद उपक्रम राबवला. या गावाने स्वातंत्र्यदिनी महिला सन्मानाचे, सक्षीकरणाचे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
स्वातंत्र्यदिनी कराड तालुक्यातील येणके गावाने एक अभिनव उपक्रम राबवला. गावातील ७५ विधवा महिलांच्या हस्ते ७५ राष्ट्रध्वज फडकवण्यात आले. या उपक्रमासह येणके गावाने एक आदर्श समाजासमोर ठेवला आहे. ७५ विधवा माता आणि भगिनींनी काल येणके गावात ध्वजारोहण केले. तसेच यापुढे गावातील विधवा महिलांना ‘विधवा’ असे न संबोधता त्यांना ‘संघर्ष भगिनी महिला’ असेही संबोधित करण्यात येणार आहे. हा सन्मान मिळाल्यानंतर विधवा माता आणि भगिनींच्या डोळ्यातून आनंदाश्रू निघाले.
हे ही वाचा:
भ्रष्टाचार, घराणेशाहीवर राहुल गांधींची बोलती बंद
पुलवामात दोन दहशतवाद्यांना टिपणाऱ्या देवेंद्र प्रताप सिंह यांना कीर्ती चक्र
‘भ्रष्टाचार आणि घराणेशाही नष्ट करू’
विधान परिषद आमदारकी फुटकळ आहे का ?
विधवा माता आणि भगिनींना सन्मान देण्यासाठी येणके गावातील ग्रामसेवा सार्वजनिक प्रतिष्ठान ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी एक पाऊल उचलत त्यांना तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण करण्याचा मान दिला. स्वातंत्र्य दिनी गावाच्या प्रमुख ध्वजारोहण कार्यक्रमात विधवा महिलांनी तिरंगा ध्वज फडकवण्याची भारतातील ही पहिलीच घटना असल्याचे ग्रामस्थांचे आणि गाव प्रमुखांचे म्हणणे आहे. त्यामुळे याउपक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले. या प्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती आप्पासाहेब गरुड, सरपंच निकहत मोमीन, उपसरपंच नीलम गरुड, ग्रामसेवक, पोलीस पाटील आणि ग्रामस्थ उपस्थित होते.