बद्रीनाथ महामार्गावरील पुरसारी आणि मैथना दरम्यानचा ७० मीटरचा भाग गुरुवारी सकाळी खचू लागला होता. शुक्रवारी त्यात आणखी वाढ झाली. गेल्या २४ तासांत, रस्त्याचा काही भाग तीन फुटांपर्यंत खचला गेला. हा भाग जोशीमठपासून सुमारे ५० किमी अंतरावर आहे. जोशीमठ हा परिसरही काही दिवसांपासून खचू लागला आहे. रस्ता खचू लागला असला तरी या मार्गावर वाहतूक सुरूच आहे. राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड (एनएचआयडीसीएल)च्या कर्मचाऱ्यांनी खराब झालेल्या भागाच्या दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. मात्र या भागात आधीही रस्ता खचला आहे, अशी माहिती एनएचआयडीसीएलचे अधिकारी शैलेंद्र कुमार यांनी दिली.
‘येथे याधीही रस्ता खचला असल्याने पाच वर्षांपूर्वी दरीच्या बाजूला रस्त्याच्या खाली संरक्षक भिंत (रिटेनिंग वॉल) उभी करण्यात आली होती. अलकनंदा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे ती भिंत कमकुवत झाल्याचे दिसत आहे. महामार्गाच्या एका स्थिर भागातून जाण्यासाठी वाहतूक सुरळीत केली जात आहे, परंतु परिस्थिती आणखी बिघडल्यास एनएचआयडीसीएलकडून वाहतुकीसाठी महामार्ग बंद करण्यासाठी प्रशासनाला पत्र लिहेल, असेही त्यांनी सांगितले.
हे ही वाचा:
जनधन खात्यांनी गाठला ५० कोटींचा महत्त्वपूर्ण टप्पा
रतन टाटा महाराष्ट्राचे पहिले ‘उद्योगरत्न’
म्यानमारमध्ये पळालेले २१२ भारतीय परतले भारतीय लष्करामुळे मायदेशी
राज्यातील सर्वच रुग्णालयात सीसीटीव्हीद्वारे ऑनलाइन देखरेख करावी
मात्र स्थानिकांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. चारधाम रस्ते प्रकल्पासाठी सुरू असलेल्या रस्त्याच्या कामांमुळे हा रस्ता खचला असण्याची शक्यता स्थानिकांनी स्थापन केलेल्या जोशीमठ बचाव संघर्ष समितीचे अतुल सती यांनी व्यक्त केली आहे.
चमोली गावातील एकमेव रस्ता वाहून गेला
या आठवड्यात भूस्खलन आणि मुसळधार पावसाने चमोली गावात हाहाकार माजवल्याने देवल परिसरातील बान गावातील स्थानिकांचा अन्य गावांशी संपर्क तुटला आहे. या गावाला जोडणारा, वाहनांची वाहतूक होऊ शकणारा एकमेव रस्ता मुसळधार पावसात वाहून गेला आहे. त्यामुळे किरण देवी या २९ वर्षीय गर्भवती महिलेला तीव्र प्रसूतीवेदना जाणवू लागल्याने गावातल्या पुरुषांनी तिला प्लास्टिकच्या खुर्चीवर बसवले. तसेच, तिला खांद्यावर उचलून घेऊन घाट आणि ढिगाऱ्यावरून चालत प्राथमिक आरोग्य केंद्रात न्यावे लागले. गुरुवारी उशिरा किरणने मुलाला जन्म दिला. या प्रवासाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ‘देवल प्राथमिक आरोग्य केंद्र आमच्या गावापासून जवळपास ३० किमी आहे, पण मुसळधार पावसामुळे आम्हाला रस्ताच राहिलेला नाही. या पट्ट्यातील तीन किमीपेक्षा जास्त अंतर पार करणे आता अशक्य झाले आहे,” असे स्थानिक रहिवासी खिलाफ सिंग यांनी सांगितले.