अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे झाड पत्र्याच्या शेडवर पडून झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला तर ३० ते ३५ जण जखमी झाले असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने सोमवारी दिली. ही दुर्घटना पारस येथील बाबूजी महाराज मंदिरात घडली आहे. वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसामुळे बाबूजी महाराज मंदिरामंदिराच्या जवळ असलेल्या पत्र्याच्या शेडवर हे झाड अचानक पडले. पावसापासून बचाव करण्यासाठी ही सर्व लोक या झाडाखालच्या पत्र्याच्या शेडखाली आडोशाला उभी होती. पावसापासून बचाव केला पण या झाडापासून बचाव करता आला नाही आणि ही दुर्दैवी घटना घडली.
पारसमधील महात्मा फुले विद्यालयाजवळ समर्थ बाबुजी महाराज संस्थानचे मंदिर आहे. संध्याकाळी भाविक या मंदिरात आरतीसाठी जमा झाले होते. आरती संपल्यानंतर अचानक सोसाट्याचा वारा आणि वादळी पाऊस सुरु झाला. पावसापासून बचाव करण्यासाठी अनेक भाविक मंदिराच्या जवळ असलेल्या पत्र्याच्या शेड खाली आडोशाला उभे राहिले होते. त्याचवेळी शेजारी असलेले १०० वर्षांपूर्वीचे कडुनिंबाचे एक मोठे झाड अचानक या शेडवर कोसळल्याने त्यात उभे असलेले सुमारे ५० पेक्षा जास्त भाविक अडकले.
या घटनेत सात जण ठार तर २३ जण जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जखमींपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. पावसामुळे बाळापूर-पारस मार्गावर झाडे उन्मळून पडल्याने बचावकार्यात अडथळा निर्माण झाला होता. शेडखालून ३० ते ३५ जखमींना बाहेर काढण्यात आले. या सर्वांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. त्यापैकी काहींना किरकोळ मार लागलेला होता. त्यांच्यावर उपचार करून सोडून देण्यात आले. जखमींना अकोला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.
हे ही वाचा:
मंदिर वही बनायेंगेचा नारा सत्यात उतरतांना बघतोय
शरद पवारांनी केली विचारवंत, पुरोगाम्यांची कोंडी
भारतातील वाघांची संख्या वाढली, आता ३१६७ वाघ
राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाची माफी मागून प्रकरण संपवायला हवं होतं!
पीडित कुटुंबांना मदत
अकोला जिल्ह्यातील झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपये मदत त्यांनी जाहीर केली आहे. तसेच सर्व जखमींवर शासकीय खर्चाने व्यवस्थित उपचार करण्यात यावेत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या अपघातात भाविकांच्या मृत्यूबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.