उल्हासनगरात स्लॅब कोसळून सात जणांचा मृत्यू

उल्हासनगरात स्लॅब कोसळून सात जणांचा मृत्यू

उल्हासनगरात इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. उल्हासनगरमधील नेहरु चौक परिसरातील साई शक्ती या पाच मजली इमारतीचा स्लॅब कोसळल्याची दुर्घटना घडली. या घटनेनंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्घटनाग्रस्त इमारतीची पाहणी केली. तसेच मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत जाहीर केली.

उल्हासनगरमधील नेहरू चौक परिसरात साई शक्ती नावाची एक पाच मजली इमारत आहे. या इमारतीत एकूण २९ फ्लॅट्स आहेत. काल (२८ मे) रात्री १० च्या सुमारास या इमारतीचा चौथ्या मजल्याचा स्लॅब पत्त्यासारखा कोसळून थेट तळमजल्यावर आला. यामुळे मोठी दुर्घटना घडली.

या घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यापाठोपाठ ठाणे महानगरपालिकेची टीडीआरएफ टीम देखील घटनास्थळी दाखल झाली. या दुर्घटनेत आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर आहे. विशेष म्हणजे इमारतीच्या ढिगाऱ्याखालून आतापर्यंत ५ जणांना बाहेर काढण्यात यश आलं.

गेल्या महिन्याभरात उल्हासनगरमध्ये अशाप्रकारची तिसरी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेतील मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.  दरम्यान गेल्याच आठवडयात उल्हासनगरमधील मोहिनी पॅलेस इमारतीमध्ये देखील अशाच प्रकारची दुर्घटना घडली होती. त्या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला होता.

हे ही वाचा:

मुंबई महापालिकेला हवेत महागातले कॉन्सन्ट्रेटर

ऑक्सिजन एक्सप्रेस सुसाट

अखेर जालन्यातील ‘त्या’ पोलिस अधिकाऱ्यांचे निलंबन

पश्चिम बंगालच्या मदतीसाठी धावलेल्या पंतप्रधानांचा ममता दीदींकडून अपमान

सतत घडणाऱ्या या घटनांमुळे उल्हासनगरमधील धोकादायक इमारतीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. १९९४ -९५ मध्ये बांधलेल्या काही धोकादायक इमारतीमधील स्लॅब पालिकेने कारवाई करत तोडले होते. मात्र विकासकाने हेच स्लॅब वेल्डिंग करत परत जोडले. त्यामुळे या दुर्घटना होत आहेत. यामुळे अशा इमारती शोधून त्या तात्काळ खाली कराव्या. तसेच अशा इमारती बांधणाऱ्या विकासकांवर कारवाई करावी, असे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयुक्तांना दिले आहेत.

Exit mobile version