६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली असून प्रख्यात गायक राहुल देशपांडे यांना सर्वाेत्कृष्ट पार्श्वगायनासाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारात अभिनेता अजय देवगणचा ‘तान्हाजी द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. तर बेस्ट फिचर फिल्ममध्ये मराठीत ‘गोष्ट एका पैठणीची’ आणि हिंदीत आशुतोष गोवारिकर प्रोडक्शनचा ‘तुलसीदार ज्युनियर’ या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले आहेत. ‘तान्हाजी द अनसंग वॉरियर’ या चित्रपटासाठी अभिनेता अजय देवगण आणि अभिनेता सूर्याला ‘सोरारई पोटरु’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार या दोन अभिनेत्यांना विभागून देण्यात आला आहे.
माहिती व प्रसारण मंत्रालयातर्फे हे पुरस्कार जाहीर होणार आहेत. या पुरस्कारांची घोषणा तसेच पुरस्कार सोहळ्याचे आयोजन या सर्वांची जबाबदारी डायरेक्ट्रेट ऑफ फिल्म फेस्टिव्हल या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या एका शाखेवर सोपवलेली असते. या पुरस्कारांसाठी दरवर्षी हिंदीसह, मराठी, कन्नड, मणिपुरी, पंजाबी, तमिळ, तेलुगू, छत्तीसगढ़ी, हरियाणवी या भाषांसह इतर प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांना नामांकन दिली जातात. यंदाच्या ६८व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली जाणार असल्याची माहिती प्रेस इनफॉर्मेशन ब्युरोच्या अधिकृत ट्विटर पेजवरून देण्यात आली होती.
राहुल देशपांडे यांना ‘मी वसंतराव देशपांडे’ या चित्रपटासाठी सर्वाेत्कृष्ट गायकाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. तर
स्पेशल ज्युरी अवॉर्ड मराठीतील ‘जून’ या चित्रपटासाठी सिद्धार्थ मेननला मिळाला आहे. तर ‘अवांछित’ आणि ‘गोदाकाठ’ या चित्रपटातील भूमिकांसाठी अभिनेते किशोर कदम यांना विशेष सन्मान मिळाला आहे. ‘टकटक’ या मराठी चित्रपटातील भूमिकेसाठी अनिष मंगेश गोसावीला बालकलाकाराचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
सोरारई पोटरुचे जीव्ही प्रकाश कुमार यांना सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचा मान मिळाला असून ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ला सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझायनरचा पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट गीतलेखनाचा पुरस्कार ‘सायना’ या हिंदी चित्रपटाला मिळाला आहे. त्याचे गीतकार मनोज मुंतशीर आहेत. सर्वोत्कृष्ट हरियाणवी चित्रपट ‘दादा लक्ष्मी’ निवडला गेला आहे.
काय आहे पुरस्काराचे स्वरूप?
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये प्रत्येक विभागासाठी वेगळा पुरस्कार दिला जातो. रौप्य कमळ, सुवर्ण कमळ अशी त्यांची नावे आहेत. काही पुरस्कारात रोख रक्कम दिली जाते, तर काहींमध्ये केवळ मेडल दिले जाते. दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्यांना सुवर्ण कमळ, १० लाख रुपये, प्रशस्तीपत्र आणि शाल प्रदान केली जाते. तर सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कार ज्यांना मिळतो, त्यांना सुवर्ण कमळ आणि अडीच लाख रुपयांची रक्कम प्रदान करण्यात येते. बऱ्याच विभागांमध्ये रौप्य कमळ व दीड लाख रुपयांची रक्कम, पुरस्कारार्थ देण्यात येते.
कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात येतात राष्ट्रीय पुरस्कार?
हे पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात येतात. मात्र काही वर्षांपासून हे पुरस्कार उपराष्ट्रपती अथवा माहिती व प्रसारण मंत्री यांच्या हस्ते दिले जात आहेत. 2021 साली उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण झाले होते.
असे आहेत पुरस्कार :
• सर्वोत्कृष्ट अभिनेता (विभागून) : अजय देवगण (तान्हाजी) आणि सुर्या (सोरारई पोटरु)
• सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट: तुलसीदास (आशुतोष गोवारीकर)
• सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट: तान्हाजी : द अनसंग वॉरियर
• सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म: सोरारई पोटरु (तामिळ)
• सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: अपर्णा बालमुरली (सोरारई पोटरु)
• सर्वोत्कृष्ट गीतकार : मनोज मुंतशीर (सायना)
• सिनेमावरील सर्वोत्कृष्ट पुस्तक: द लाँगेस्ट किस- किश्वर देसाई यांनी लिहिलेले आहे
• सर्वोत्कृष्ट कथन ‘व्हॉईस ओव्हर’ पुरस्कार: शोभा थरूर श्रीनिवासन ‘रॅपसोडी ऑफ रेन – मान्सून ऑफ केरळ’साठी
• सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन: विशाल भारद्वाज (१२३२ किलोमीटर)
• कौटुंबिक मूल्यांवरील सर्वोत्कृष्ट चित्रपट: अभिजित दळवी
• सर्वाधिक फिल्म फ्रेंडली राज्य: मध्य प्रदेश सर्वाधिक फिल्म फ्रेंडली (विशेष उल्लेख) उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश
• सामाजिक समस्यांवरील सर्वोत्कृष्ट चित्रपट: जस्टिस डिलेड बट डिलिवर्ड आणि थ्री सिस्टर्स
• सर्वोत्कृष्ट बालचित्रपट सुमी दिग्दर्शक- अमोल गोळे
• सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट: फनरल (मराठी) विवेक दुबे
• सर्वोत्कृष्ट बालकलाकार मराठी चित्रपट : अनिश गोसावी
• सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट : गोष्ट एका पैठणीची दिग्दर्शक- शांतनू रोडे
• विशेष उल्लेखनीय फिचर फिल्म : जून (मराठी) , अभिनेता- सिदार्थ मेनन, गोदाकाठ (मराठी), अवांचित (मराठी) अभिनेता- किशोर कदम