अरबी समुद्रातील ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाची तीव्रता वाढताना दिसत असून या वादळामुळे समुद्र खवळला आहे. भारताच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत असताना वादळाने दिशा बदलल्याने आता हे वादळ पाकिस्तानच्या दिशेने जात आहे. जोरदार वारा सुटला असून काही ठिकाणी ढगांच्या कडकडाटासह पाऊस कोसळत आहे. दरम्यान, वादळाचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने खबरदारीच्या उपयायोजना केल्या आहेत. तसेच ६७ रेल्वे गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत.
रेल्वे प्रशासनाने खबरदारी म्हणून ‘बिपरजॉय’ चक्रीवादळामुळे ६७ गाड्या रद्द केल्या आहेत. १५ जूनपर्यंत या गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी बसेसही तैनात करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे रुग्णवाहिकांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. गुजरातच्या सौराष्ट्र आणि कच्छ भागांना बिपरजॉय वादळाचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. या भागात पश्चिम रेल्वेचे भावनगर, राजकोट आणि अहमदाबाद हे विभाग येतात. त्यामुळे रेल्वेने खबरदारीचे उपाय केले आहेत.
मुंबई किनारपट्टी भागात बुधवारी वाऱ्याचा वेग हा ताशी ४० ते ५० किमी इतका राहण्याचा अंदाज आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर १४ आणि १५ जून रोजी गुजरातच्या काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
हे ही वाचा:
जी- २० परिषदेसाठी आलेले परदेशी पाहुणे वारीत दंग
मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे मिळणार
दोन वर्षात १५० हून अधिक वेब साईट्स, युट्युब चॅनेल्सवर बंदी
सर्वाधिक विजेतीपदे जिंकणाऱ्या कोरियाला नमवले; भारताच्या ज्युनियर महिला अजिंक्य
पंतप्रधान मोदी यांनी घेतली माहिती
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. यावेळी त्यांनी बिपरजॉय चक्रीवादळासंदर्भातील पूर्वतयारीची माहिती घेतली. आपत्तीच्या काळात सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन केंद्र सरकारने दिलं आहे.