हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये संततधार पाऊस आणि भूस्खलनामुळे अनेक ठिकाणी घरे कोसळून आतापर्यंत ६६ जणांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनेत जखमींना वाचवण्याचे आणि ढिगाऱ्यांमधून मृतदेह बाहेर काढण्याचे काम आजून सुरूच आहे.
देशाच्या अनेक भागात मुसळधार पावसानं धुमाकूळ घातला आहे. काही भागात पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. विशेषत: उत्तर भारतात मुसळधार पाऊस कोसळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या सततच्या पावसामुळं उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये ६६ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे तर दोन्ही राज्यांमध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हिमाचल प्रदेशात १३ ऑगस्टपासून मुसळधार पावसामुळे सर्वाधिक मृत्यू हिमाचल मध्ये झाले असून यात ६० जणांचा मृत्यू झाला आहे, याबाबतची माहिती मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी दिली.
हे ही वाचा:
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची राम कथेला हजेरी
केंद्र सरकारने ठरवले टॉमेटो विकायचे ५० रुपये किलो दराने!
अजित पवारांसमोरच कार्यकर्त्यांकडून गोंधळ !
हरियाणातील नूह हिंसाचारप्रकरणी गोरक्षक बिट्टू बजरंगीला अटक !
हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या दोन्ही राज्यांमध्ये भूस्खलन, पूर, ढगफुटी आणि अतिवृष्टीमुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पाऊस आणि भूस्खलनामुळे येथील पायाभूत सुविधा उद्ध्वस्त झाल्या आहेत. तसेच या दोन्ही राज्यात शेती पिकांना देखील मोठा फटका बसला आहे. पूरस्थिती निर्माण झाल्यामुळं हिमाचलमध्ये स्वातंत्र्यदिनाचे कोणतेही कार्यक्रम घेण्यात आले नाहीत. साध्या पद्धतीनं सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले नव्हते. शिमल्यामध्ये भूस्खलन झाल्याने शिव मंदिर कोसळून आत्तापर्यंत २४ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेश विद्यापीठाने १९ ऑगस्टपर्यंत शैक्षणिक उपक्रम स्थगित केले आहेत. विद्यापीठाचे ग्रंथालयही २० ऑगस्टपर्यंत बंद राहणार आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज ( १६ ऑगस्ट) आणि उद्या (१७ ऑगस्ट) रोजी राजस्थानच्या काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच बिहार, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयच्या काही भागातही मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्येही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.