लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील १०२ जागांसाठी मतदान झाले. रात्री नऊ वाजेपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, एकूण ६२.३७ टक्के मतदान झाले असून त्रिपुरामध्ये सर्वाधिक ८०.१७ टक्के मतदान झाले. पश्चिम बंगाल आणि मणिपूरच्या काही भागांमध्ये हिंसाचाराची नोंद झाली. २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी कमी होती.
प. बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने भाजप समर्थकांवर कूचबिहार जिल्ह्यातील सीतलकुची येथे अराजकता निर्माण करण्याचा, त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आणि मतदारांना धमकावल्याचा आरोप केला आहे. तर, मणिपूरमध्ये, थामनपोकपी येथील मतदान केंद्राजवळ अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला आणि इरोइसेम्बा मतदान केंद्रावरही हिंसाचार झाला. असे असूनही, मणिपूरमध्ये ६८.६२% आणि बंगालमध्ये ७७.५७% मतदान झाले.
२०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या देशात पहिल्या टप्प्यात ६९.४३ टक्के मतदान झाले होते.
बिहारमध्ये सर्वांत कमी ४८.५ टक्के मतदान झाले. काँग्रेसचे दिग्गज नेते पी चिदंबरम, त्यांचे पुत्र आणि शिवगंगा मतदारसंघातील उमेदवार कार्ती चिदंबरम, दिग्गज अभिनेते रजनीकांत, आरएसएस प्रमुख मोहन भागवत आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे प्रमुख एमके स्टॅलिन यांच्यासह अनेक प्रमुख नेते आणि व्यक्तिमत्त्वांनी मतदान केले.
काँग्रेसचे दिग्गज नेते पी. चिदंबरम यांनी तामिळनाडूमधील चेन्नईमधून मतदान केले आणि दक्षिणेकडील राज्यातील सर्व ३९ जागा जिंकून इंडियाचा विजय होईल, असा विश्वास व्यक्त केला. ‘हा निवडणुकीचा पहिला टप्पा आहे, त्यात सात टप्पे आहेत… आज तमिळनाडूतील सर्व मतदारसंघांमध्ये निवडणुका आहेत आणि मला पूर्ण विश्वास आहे की आम्ही सर्व जागा जिंकू,’ असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. योगगुरू बाबा रामदेव आणि पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांनी उत्तराखंडमधील हरिद्वार येथील मतदान केंद्रावर मतदान केले.
तमिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोईम्बतूर मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार के. अण्णामलाई यांनी करूर गावातील उथुपट्टी मतदान केंद्रावर मतदान केले. ‘राज्यात द्रविड राजकारणाचा काळ संपला आहे,’ असा दावा करून त्यांनी द्रमुक आणि अण्णाद्रमुक पक्षांनी मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी कोईम्बतूरमध्ये एक हजार कोटींहून अधिक खर्च केल्याचा आरोप केला. अनेक ठिकाणी मतदार यादीतून लोकांची नावे गहाळ झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत आणि त्या भागात भाजप पुन्हा मतदान घेण्याची मागणी करणार असल्याचे ते म्हणाले. मतदारयादीतून भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांची नावे गायब असल्याने राजकीय हस्तक्षेपाचा संशयही त्यांनी व्यक्त केला.
केंद्रीय मंत्री आणि कूचबिहारमधील भाजप उमेदवार निशिथ प्रामाणिक यांनी मतदान केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी दावा केला की, सत्ताधारी तृणमूल काँग्रेस लोकांना मतदान केंद्रांपर्यंत पोहोचू नये, यासाठी प्रयत्न करत आहे. ‘लोक तृणमूलच्या गुंडांना विरोध करण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत,’ असे ते म्हणाले. मतदानापूर्वी, तृणमूल काँग्रेसने प्रामाणिक यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आणि त्यांच्यावर केंद्रीय दलांवर नियंत्रण ठेवण्याचा, घरात शस्त्रसाठा केल्याचा आणि गुंडांना आश्रय दिल्याचा आरोप केला.
हे ही वाचा:
‘माझ्या मुलीची हत्या ‘लव्ह जिहाद’मुळे’
मोदीस्तुती करणारे गाणे गाणाऱ्या युट्युबरवर मुस्लिम तरुणांचा हल्ला
मुंबईचा पैसा, लखनौची जमीन, ठाकरेंच्या नावाने गलका…
छगन भुजबळांची नाशिकमधून माघार, गोडसेंचा मार्ग मोकळा!
पहिल्या टप्प्यात, तमिळनाडू (३९), उत्तराखंड (५), अरुणाचल प्रदेश (२), मेघालय (२), अंदमान आणि निकोबार बेटे (१), मिझोराम (१), नागालँड (१) सर्व जागांवर मतदान झाले. तर, पुडुचेरी (१), सिक्कीम (१) आणि लक्षद्वीप (१), राजस्थानमधील १२, उत्तर प्रदेशातील आठ, मध्य प्रदेशातील सहा, आसाम आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी पाच, बिहारमध्ये चार, पश्चिम बंगालमधील तीन, मणिपूरमधील दोन आणि त्रिपुरा, जम्मू काश्मीर आणि छत्तीसगडमधील प्रत्येकी एका जागेसाठी मतदान झाले. शुक्रवारी मतदान झालेल्या १०२ जागांपैकी एनडीएने २०१९च्या निवडणुकीत ४१ जागा जिंकल्या होत्या तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएने ४५ मतदारसंघांत विजय मिळवला होता.