पाटणा रेल्वे स्थानकाजवळील हॉटेलला आग, ६ जणांचा मृत्यू!

सिलेंडरच्या स्फोटाने आग लागल्याची प्राथमिक माहिती, अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात

पाटणा रेल्वे स्थानकाजवळील हॉटेलला आग, ६ जणांचा मृत्यू!

पाटणा जंक्शन रेल्वे स्थानकाजवळील एका हॉटेलला गुरुवारी (२५ एप्रिल) लागलेल्या आगीत किमान सहा जणांचा मृत्यू झाला, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाल्याची माहिती असून त्यांच्यावर पाटण्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पाटणा शहराचे एसपी चंद्र प्रकाश यांनी या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे.

सिलिंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांचा जागीच मृत्यू झाला तर चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत तर अनेकांना हॉटेल मधून बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश मिळाले आहे.

हे ही वाचा:

सलमान खान गोळीबार प्रकरणी दिल्ली पोलिसांकडून आरोपींची तीन तास चौकशी

‘शरद पवारांच्या राजकीय आयुष्यात शपथेला नाही तर खंजीराला महत्व’

बेकायदेशीर आयपीएल स्ट्रीमिंग ऍप प्रकरणी सायबर सेलकडून तमन्ना भाटियाला समन्स

पॅलेस्टाइन पाठिंब्याचे, इस्रायलविरोधाचे लोण पसरले अमेरिकेतील विद्यापीठांत

घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या मोठ्या प्रमाणात दाखल झाल्या आणि आग विझवण्यात आली.पाटणा अग्निशमन विभागाच्या महासंचालक शोभा अहोकर यांनी पत्रकारांना सांगितले की, आग आता नियंत्रणात आली आहे.अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, सुरक्षा नियमांचे पालन न केल्यामुळे ही आग लागली.

हॉटेलला लागलेल्या आगीनंतर ४५ जणांना वाचवून बाहेर काढण्यात आले आहे, तर ३८ जणांवर पाटणा येथील पीएमसीएच रुग्नालयात उपचार सुरु आहेत.पाटणाच्या कोतवाली पोलीस ठाण्यांतर्गत झालेल्या या अपघाताबाबत पाटण्यात बराच काळ गोंधळ उडाला होता. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.

Exit mobile version