उत्तरकाशीत अडकलेल्या कामगारांच्या पोटाला आधार मिळाला, पाइपलाइनमधून अन्नपुरवठा

खिचडी, फळे कामगारांपर्यंत पाठवली

उत्तरकाशीत अडकलेल्या कामगारांच्या पोटाला आधार मिळाला, पाइपलाइनमधून अन्नपुरवठा

उत्तरकाशीमधील बोगद्यात गेल्या नऊ दिवसांपासून अडकलेल्या ४१ कामगारांपर्यंत सहा इंच रुंदीचा पाइप सोडण्यात मदत पथकाला यश आले आहे. त्यातून प्लास्टिक बाटल्यांच्या साह्याने त्यांना पोषक आहार पुरवण्यात आला आहे. तेथील कामगारांची प्रकृती लक्षात घेऊन वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने त्यांना पोषक आहार मिळावा, यासाठी डाएट प्लॅन दिला जात आहे. सोमवारी त्यांना खिचडी, केळी, संत्री, सफरचंद ही फळे आणि दलियाचा पुरवठा करण्यात आला. प्लास्टिक बाटल्यांमध्ये खिचडी भरून ती त्यांना देण्यात आली. तसेच, संवाद साधण्यासाठी फोन आणि चार्जरही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आला आहे.

सोमवारी बोगदा आणि भुयारी मार्गाच्या आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. ‘इंटरनॅशनल टनेलिंग अँड अंडरग्राऊंड स्पेस असोसिएशन’चे अध्यक्ष अरनॉल्ड डिक्स हे या तज्ज्ञांसोबत आहेत. ‘आम्ही या सर्व कामगारांना बाहेर काढू. येथे खूप चांगले काम होत आहे. आमचे संपूर्ण पथक येथे आहे आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी आम्ही उपाय शोधू. येथे बरेच काम केले जात आहे. त्या सर्वांची सुटका करणेच महत्त्वाचे नाही तर, ज्यांची सुटका केली जात आहे, ते सुरक्षित राहणेही तितकेच महत्त्वाचे आहे,’ असे त्यांनी सांगितले. ‘संपूर्ण जग मदत करत आहे. येथे आलेले आमचे पथकही उत्तम आहे. योजनाही चांगल्या दिसत आहेत. काम सुयोग्य पद्धतीने सुरू आहे. अन्नपदार्थ आणि औषधे व्यवस्थित पुरवली जात आहेत,’ अशी माहिती त्यांनी दिली.

हा बोगदा नॅशनल हायवे अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत बनवला जात आहे. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी चार धाम रस्त्याच्या प्रकल्पाचा हा एक भाग आहे. सिल्कयारा बोगद्याच्या बारकोट भागात उभे खोदकाम करण्याचे काम द ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनला (ओनजीसी) देण्यात आले आहे. त्यातलाच एक भाग १२ नोव्हेंबर रोजी कोसळला.

हे ही वाचा:

इस्रायलकडून युद्धविराम झाला नाही तर असेच होणार अपहरण!

भारत-ऑस्ट्रेलिया करणार चीनच्या आव्हानांचा एकजुटीने सामना

राम मंदिरातील पुजारी पदासाठी आले तब्बल ३ हजार अर्ज!

पंतप्रधान मोदी, योगी आदित्यनाथ यांना धमकी देणाऱ्याच्या मुंबई पोलिसांनी आवळल्या मुसक्या

ओएनजीसीचे ड्रिलिंग कामाचे प्रमुख सोमवारी घटनास्थळी भेट देणार असून ते पुढच्याच दिवशी आपला अहवाल सादर करतील. त्यानंतर बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन ओनजीसीच्या अहवालानुसार रस्त्याचे काम अंतिम करतील. भारतीय लष्करही या संपूर्ण कामावर देखरेख ठेवणार आहे. बोगद्याच्या ठिकाणी ड्रोनही दाखल झाले असून त्याच्या मदतीने हवाई मार्गाने कामाच्या प्रगतीवर देखरेख आणि काही गरज लागल्यास मदत केली जाणार आहे.

 

अडकलेल्या कामगारांच्या सुटकेसाठी सुरक्षित रस्ता बनवणे, हे प्राधान्य असल्याचे राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे महानिरीक्षक नरेंद्र सिंह बुंदेला यांनी सांगितले. आम्ही कामगारांना ऑक्सिजन, पाणी आणि अन्नपदार्थांचा पुरवठा पाइपद्वारे करत आहोत. अन्य पाइप पाठवून कामगारांची सुटका करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. तसेच, अन्य पर्यायही चाचपडून पाहात आहोत. सध्या तरी कामगारांची सुरक्षा हीच सर्वांत महत्त्वाची बाब आहे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version