कोरोनाचा काळ लक्षात घेता, महापालिकेचे अर्थकारण संकटात आहे. असे दस्तुरखुद्द महापालिकाच सांगत आहे. असे असतानाही अनाठायी खर्च काही कमी झालेले नाहीत. आता महापालिका केवळ दोन विभागासांठी पदपथाच्या नावाने ५१ कोटी खर्च करणार आहे.
मुंबईतील अनेक पदपथांची अवस्था सध्याच्या घडीला बिकट आहे. परंतु महापालिका केवळ दोन विभागातील पदपथांवर जवळपास ५१ करोडोंचा चुराडा करणार आहे, असे म्हटले जात आहे. चेंबूर आणि माटुंग्यासाठी ३२ कोटी खर्च केले जाणार असून गोरेगावमधील पदपथासाठी १९ कोटींचा खर्च होणार आहे. फॅन्सी प्रकल्पांवर इतका खर्च का होतोय असाच प्रश्न आता पडलेला आहे.
महानगरातील पदपथ पादचाऱ्यांसाठी अडचणीचे कारण बनले आहेत. उखडलेले पेव्हर ब्लॉक, मोठे खड्डे हे मुंबईतील पदपथांचे वैशिष्ट्य बनले आहेत. दक्षिण मुंबईतील काळा घोडा येथील फूटपाथ बदलल्यानंतर आता महापालिका त्याच धर्तीवर मुंबईतील इतर पाच फूटपाथ तयार करणार आहे. पालिका प्रशासनाने हा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीकडे पाठवला असून, त्यावर लवकरच निर्णय होणार आहे.
माटुंगा आणि चेंबूरमधील दोन पदपथांची दुरुस्ती आणि सुशोभीकरण केले जाणार आहे. यावर तब्बल ३२ कोटी ४ लाखांचा खर्च येणार आहे. तसेच गोरेगावमधील एमजी मार्ग, वांद्रे पूर्वेकडील आरकेपी आणि संत ज्ञानेश्वर मंदिर मार्गावरील फूटपाथच्या दुरुस्तीसाठी १९ कोटी ७० लाख रुपये खर्च करण्याची योजना आहे. मुंबईत असे अनेक पदपथ आजच्या घडीला आहेत, जे चालण्यासाठी योग्य राहिले नाहीत.
हे ही वाचा:
बाप्पाच्या तयारीसाठी ऑनलाईन खरेदीला पसंती!
या दोन केंद्रीय मंत्र्यांनी घेतला माटुंग्यात डोशाचा आस्वाद
निर्बंध असले तरी वाजंत्र्यांना परवानगी द्या!
सोळा वर्षे झाली, निष्क्रियतेची ‘मिठी’ कधी दूर होणार?
फुटपाथच्या दुरुस्तीसाठी पालिकेने आता सल्लागार नेमला आहे. सल्लागाराच्या सूचनेनुसार काळा घोडा येथील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टसमोरील पदपथ बांधण्यात आला आहे. त्याचप्रमाणे माटुंगा, चेंबूर, वांद्रे आणि गोरेगाव या पदपथांचीही दुरुस्ती व सुशोभीकरण करण्यात येणार आहे.