डोंबिवलीतील शाळेच्या शिक्षिकेकडून ५० ते ६० विद्यार्थ्यांना बेदम मारहाण!

विद्यार्थ्यांना मारहाणीकरीता शिक्षिकेकडून लोखंडी रॉडचा वापर, अनेक मुलं जखमी

डोंबिवलीतील शाळेच्या शिक्षिकेकडून ५० ते ६० विद्यार्थ्यांना बेदम मारहाण!

एका शिक्षिकेने ५० ते ६० विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिक्षिकेच्या वृत्तीमुळे मुलांच्या पालकांनी शाळेत धाव घेतली. या प्रकरणी मनसे आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी आंदोलन करत शाळेत गोंधळ घातला.

डोंबिवलीतील एस एच जोंधळे विद्यामंदिर शाळेत एका शिक्षिकेने ५० ते ६० विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे मुलांच्या संतप्त पालकांनी शाळेत धाव घेत जाब विचारण्यास सुरूवात केली. त्यांनी या प्रकाराची माहिती मनसे विद्यार्थी सेनेलाही दिली. त्यानंतर मनविसे च्या कार्यकर्त्यांनीही शाळेत येऊन जाब विचारात गोंधळ घातला आणि संबंधित शिक्षिकेवर कारवाई करण्याची मागणी केली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती वरती नियंत्रण आणण्याचं काम त्यांच्याकडून करण्यात आले आहे.

मारहाण करणारी शिक्षिका नीलम भारमल असे तिचे नाव असून ह्या शिक्षिका इंग्रजी माध्यम मध्ये गणित विषय शिकवण्याचं काम करतात. घडले असे की, विद्यार्थ्यांना गणित विषय शिकवत होत्या. मात्र, विद्यार्थाना गणित येत नाही म्हणून पाचवी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांनी बेदम मारहाण केली. मारहाण करण्यासाठी शिक्षिकेने लोखंडी रॉडचा वापर केल्याने अनेक मुलं गंभीर जखमी झाली. विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याने पालकांनी थेट शाळा गाठली. यावेळेस शिवसेना व मनसेच्या पदाधिकाऱ्यांना देखील कारवाईसाठी शाळेच्या मुख्याध्यापिकाच्या कार्यालयात तीन तास ठिय्या आंदोलन करत शिक्षिकेवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

हे ही वाचा:

मद्यधुंद निवृत्त जवानाने राजधानी एक्स्प्रेसमध्ये झाडली गोळी

भारतातील इस्रायली नागरीक चिंतेत!

२०२४ साठी काँग्रेसचे फोडा आणि सत्ता ओढा धोरण…

शतकवीर रोहितमुळे भारताकडून अफगाणिस्तान स्वस्तात पराभूत

प्रकरण चिघळत असल्याचे पाहताच शाळेच्या मुख्याध्यापकांनी शिक्षकावर कारवाई करणार असल्याचे सांगितले. मुख्याध्यापक म्हणाले, हा प्रकार शाळेत पहिल्यांदाच घडला आहे. त्या शिक्षिकेची नवीनच नियुक्ती करण्यात आली होती. तिचं शिकवणं चांगले असल्यामुळे तिला ही नोकरी देण्यात आली होती. मात्र, तिने दिलेली ही शिक्षा (मारहाणीचा प्रकार) अजिबात योग्य नसून अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत. त्या संबंधित शिक्षकेवर गुन्हा दाखल करत कारवाई करण्याचे आश्वासन मुख्याध्यापकांनी दिले. तसेच भविष्यात असा प्रकार कधीच घडणार नाहीत, याची काळजी घेऊ असे आश्वासनही त्यांनी दिले.

मात्र, शाळा प्रशासन हे मनाला येईल त्याप्रमाणे वागत आहे, कोणालाही शिक्षक म्हणून रुजू करतात. या सर्व प्रकाराने विद्यार्थ्यांचे आयुष्य आणि भविष्य दोन्ही धोक्यात येत आहे. शाळेत अक्षरश: खेळ मांडला आहे, असा आरोप पालकांकडून करण्यात आला.

 

 

Exit mobile version