भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेजवळील राजोरी आणि पुंछ जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या लष्करी वाहनांवरील दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आणखी ५० अत्याधुनिक बुलेटप्रूफ वाहने पाठवण्यात आली आहेत. या गाड्यांच्या मदतीने लष्करी जवानांना जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा करणे सोपे जाणार आहे. त्यामुळे भारतीय लष्कराचे बळ वाढले असून येथील परिसरही अधिक सुरक्षित करण्यास मदत मिळणार आहे.
या अत्याधुनिक बुलेटप्रूफ अरमाडो वाहनांची लष्करी ताफ्यातील संख्या वाढल्याने सीमावर्ती राजोरी आणि पुंछ जिल्हे आता आधीपेक्षा आणखी सुरक्षित होतील. हे बुलेटप्रूफ लाइट स्पेशलिस्ट वाहन (एएलएसव्ही) विशेषतः भारतीय सशस्त्र दलासाठी बनवले गेले आहे. गेल्या काही वर्षांपासून राजोरी आणि पूंछ जिल्ह्यांत दहशतवादी हल्ल्यांत वाढ झाली आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांची सुरक्षा आणि प्रशासनिक यंत्रणेवर नव्या प्रकारे लक्ष केंद्रित केले जात आहे.
हे ही वाचा:
इंडिया गटातील काँग्रेसच्या जागावाटपाच्या योजनेला तीन राज्यांत अडथळा!
महत्त्वाच्या ‘सर्वोच्च’ निकालांचे ठरले २०२३ हे वर्ष
छत्रपती संभाजीनगरमध्ये कारखान्याला आग; सहा जणांचा होरपळून मृत्यू
महाराष्ट्राच्या मुलींची कुमारी गट खोखोत ‘नऊ’लाई, मुलांचे १८वे विजेतेपद!
आणखी गाड्या ताफ्यात येण्याची शक्यता
राजोरी आणि पूंछ जिल्ह्यांत अशा प्रकारची आणखी अत्याधुनिक वाहने तैनात केली जातील, अशी माहिती संरक्षण विभागाच्या सूत्रांनी दिली. राजोरी-पुंछच्या जंगल परिसरातून गस्त घालताना लष्करी जवान याच अत्याधुनिक बुलेट प्रूफ अरमाडो गाड्यांचा वापर करत आहेत. जेणेकरून दहशतवादी हल्ला झालाच, तर नुकसान कमीत कमी होईल. नवी अत्याधुनिक वाहने ताफ्यात दाखल झाल्यामुळे भारतीय लष्करानेही समाधान व्यक्त केले आहे.