चिमुकलीच्या उत्तराने पंतप्रधानांना आवरले नाही हसू

चिमुकलीच्या उत्तराने पंतप्रधानांना आवरले नाही हसू

मी तुम्हाला राेज टीव्हीवर पाहते. तुम्ही लाेकसभा टीव्हीत काम करता? पाच वर्षांच्या या चिमुरडीने दिलेल्या उत्तरावर पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना हसूच आवरता आले नाही. निमित्त असे की मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यातील भाजपा खासदार अनिल फिरोजिया यांनी बुधवारी आपल्या कुटुंबासह दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतली. फिराेजिया यांची पाच वर्षांची मुलगी आहनाही त्यांच्या साेबत हाेती. पंतप्रधान नरेंद्र माेदी अनेकदा लहान मुलांना भेटत असतात. ते मुलांशी पंतप्रधानांसारखे नाही तर त्यांच्यातलेच हाेऊन संवाद साधतात. त्यामुळेच लहान मुलांना पंतप्रधान माेदी आवडतात.

आहनाच्या बाबतीत असेच काही घडले. पंतप्रधानांच्या कार्यालयात गेल्यानंतर माेदी यांनी आहनाशी संवाद साधला. पंतप्रधान माेदींनी आहनाला विचारले, “तू मला ओळखतेस का?” त्यावर चिमुकली आहना तत्काळ उत्तरली, “हो, मला माहिती आहे की तुम्ही मोदीजी आहात. तुम्ही रोज टीव्हीवर दिसता.” यानंतर नरेंद्र मोदींनी तिला “मी काय काम करतो माहिती आहे का?” असं विचारलं. यावर आहनाने “तुम्ही लोकसभेत नोकरी करता” असं उत्तर दिलं. हे उत्तर ऐकताच पंतप्रधान मोदींसहित उपस्थितांना हसू आवरले नाही. आहनाचे बाेलणे एकून माेदी खूप हसले. दाेघांमध्ये जवळपास ५ ते १० मिनिटे गप्पा रंगल्या हाेत्या. नरेंद्र मोदींनी आहनाला जाण्याआधी चॉकलेटही दिलं. याआधीही नरेंद्र मोदी अनेकदा लहान मुलांसोबत संभाषण करताना दिसले आहेत. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्याबराेबरच्या संवादाचे हे खास क्षण अनिल फिरोजिया यांनी सर्वांसोबत शेअर केला आहे.

पीएम मोदींना टीव्हीवर पाहते आज भेटले

आहना म्हणाली की, “माझे नाव आहना फिरोजिया आहे आणि ती पाच वर्षांची आहे. पंतप्रधान मोदींना भेटून खूप आनंद झाला. मी रोज पीएम मोदींना टीव्हीवर पाहते. आज त्यांना भेटले. पप्पा नेहमी त्यांना भेटायला सांगत होते, आज पप्पांनी माझी ओळख करून दिली आणि मोदींनी सुद्धा मला चॉकलेट दिले. भाजपा खासदार अनिल फिरोजिया काही दिवसांपूर्वी नितीन गडकरींनी दिलेलं आव्हान स्वीकारत वजन कमी केल्याने चर्चेत होते. सोशल मीडियावर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीचे फोटो शेअर केले आहेत.

दोन्ही मुली भेटीने भारावून गेल्या

अनिल फिरोजिया यांनी ट्विट केले आणि म्हटले की, “जगातील सर्वात लोकप्रिय नेता, देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या कुटुंबासह भेटण्याचे सौभाग्य मिळाले. त्यांचे आशीर्वाद आणि जनतेच्या निस्वार्थ सेवेचा मंत्र मिळाला. आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी समर्पित केलेल्या अशा कष्टाळू, प्रामाणिक, निस्वार्थी, त्यागशील पंतप्रधानांच्या उपस्थितीत मला जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे. आज माझ्या दोन्ही मुली धाकटी आहना आणि मोठी प्रियांशी पंतप्रधानांना भेटून आणि त्यांचे स्नेह मिळवून खूप आनंदी आणि भारावून गेले आहेत.

Exit mobile version