भरधाव गाडी मेलबर्नमधील हॉटेलच्या अंगणात घुसल्याने भारतीय वंशाच्या पाच नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यात दोन लहान मुलांचा समावेश आहे. ही घटना रविवारी ऑस्ट्रेलियातील ग्रामीण व्हिक्टोरिया भागात घडली. पांढऱ्या रंगाची बीएमडब्लू एसयूव्ही गाडी भरधाव वेगाने हॉटेलच्या अंगणात घुसल्याचे पोलिसांनी सांगितले. या अपघातात विवेक भाटिया (३८), त्यांचा मुलगा विहान (११), प्रतिभा शर्मा (४४), त्यांची मुलगी अन्वी (९) आणि त्यांचे पार्टनर जतिन चुघ (३०) यांचा मृत्यू झाला.
अन्वीला मेलबर्न येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. भाटिया यांची ३६ वर्षीय पत्नी, रुची आणि सहा वर्षीय मुलगा अबीर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अबीर याची प्रकृती गंभीर असून त्याच्या पायाला जबर दुखापत झाली आहे. तसेच, अंतर्गत दुखापतही झाली आहे. मात्र त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. या अपघातात आणखी एक तान्हे बाळही जखमी झाले असून त्याच्यावरही उपचार सुरू आहेत. या बीएमडब्लूच्या ६६ वर्षीय चालकालाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र त्याला किरकोळ दुखापत झाल्याचे समजते. त्याच्या श्वासाची तपासणी केली असता, त्याने मद्यप्राशन केले नसल्याचे आढळून आले आहे. मात्र त्याची आता रक्ततपासणी केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हे ही वाचा:
अमेरिकन गायिका मिलबेनने नीतिशकुमारना सुनावले!
युक्रेनचे असल्याचे भासवत घातला ३ कोटींचा गंडा!
राजस्थानमधील सरकारी डॉक्टरला निवडणूक लढण्यास अनुमती!
मानवी तस्करीप्रकरणी ४४ जणांना अटक!
चालकाच्या वकिलाने सांगितल्यानुसार, चालक हा मधुमेहग्रस्त आहे. त्याची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. तसेच, त्याची अल्कोहोल चाचणीही निगेटिव्ह आली आहे. चालकाने या अपघातातील मृतांबद्दल शोक व्यक्त केला असल्याचा दावा या वकिलाने केला.