पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारला पत्र लिहित बलात्कार आणि हत्या यांसारख्या अक्षम्य गुन्ह्यांसाठी कठोर कायदे आणि शिक्षेची मागणी केली आहे. ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या त्यांच्या दुसऱ्या पत्रात बलात्कार आणि हत्या प्रकरणे वेळेत निकाली काढण्यासाठी अनिवार्य तरतूद करण्याची मागणी केली होती. यावर आता भाजपाने त्यांना प्रत्युत्तर देत टीकेची झोड उठवली आहे.
भाजपाने ममता बॅनर्जी यांच्या पत्रांवर मत मांडताना ममता बॅनर्जी या खोट्या असल्याचे म्हटले आहे. त्यांनी आपल्या राज्यात महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर नियम आणि कायद्यांची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी काहीही का केले नाही? असा प्रश्न भाजपाने उपस्थित केला आहे. शिवाय केंद्र सरकारने आकडेवारी समोर मांडत ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे.
केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी ममता बॅनर्जींना दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की, “पश्चिम बंगालमधील फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्ट (FTSC) आणि विशेष POCSO न्यायालयाच्या स्थितीबाबत तुमच्या पत्रात दिलेल्या माहितीच्या संदर्भात, मी याचा उल्लेख करून हे हे निदर्शनास आणू इच्छिते की, कोलकाता उच्च न्यायालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालने ८८ फास्ट ट्रॅक न्यायालये स्थापन केली आहेत. हे केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्ट (FTSC) सारखे नाहीत.”
त्यांनी पुढे लिहिले आहे की, “पश्चिम बंगालमध्ये बलात्कार आणि पॉक्सोची ४८,६०० प्रकरणे प्रलंबित असूनही, राज्य सरकारने अतिरिक्त ११ एफटीएससी कार्यान्वित केलेले नाहीत. ही विशेष पोक्सो न्यायालये किंवा संयुक्त एफटीएससी असू शकतात जी राज्याच्या गरजेनुसार बलात्कार आणि पॉक्सो दोन्ही प्रकरणे हाताळत असतील. त्यामुळे तुमच्या पत्रात असलेली माहिती वस्तुस्थितीनुसार चुकीची आहे आणि फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्ट कार्यान्वित करण्यात होणारा विलंब झाकण्यासाठीचा हा एक प्रयत्न असेल असं दिसून येत आहे.”
पश्चिम बंगालचे भाजपाचे सह-प्रभारी अमित मालवीय यांनीही महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी नियम आणि कायद्यांचे कठोर पालन सुनिश्चित करण्यासाठी पुरेशी पावले उचलत नसल्याबद्दल बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
हे ही वाचा:
कानाच्या शस्त्रक्रियेसाठी भूल दिल्यानंतर महिला पोलिसाचा मृत्यू?
पॅरिस पॅरालिम्पिक २०२४: नेमबाज मनीष नरवालने रौप्य पदकावर कोरले नाव !
पॅरालिम्पिकमध्ये नेमबाज मोनाची कांस्य पदकाची कमाई
प्रीती पालने पदक जिंकून रचला इतिहास, अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एका ज्युनियर डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. भाजपाने या घटनेचे राजकारण केल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला होता. तर, दुसरीकडे भाजपाने ममता बॅनर्जींच्या पक्षावर वैद्यकीय महाविद्यालयात भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. सध्या या प्रकरणी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष यांची चौकशी सुरू आहे. तर, सीबीआयने मुख्य संशयित संजय रॉय यालाही अटक केली आहे.