क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या संघाने रणजी ट्रॉफी स्पर्धेत बाजी मारत विदर्भाचा पराभव केला आहे. मुंबईच्या संघाने बाजी मारत ४२ व्यांदा या ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. मुंबईच्या संघाने अंतिम सामन्यात विदर्भावर १६९ धावांनी विजय मिळवला. आठ वर्षांनंतर मुंबई संघाने रणजी ट्रॉफी जिंकली आहे. मुंबईचा संघ ४८ व्यांदा रणजी फायनलमध्ये पोहचला होता. तर, विदर्भाने तीनदा अंतिम फेरी गाठली होती.
संपूर्ण सामन्यात मुंबईचे वर्चस्व दिसत होते. पहिल्यांदा फलंदाजी करताना मुंबईच्या सलामीसाठी आलेल्या फलंदाजांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली. पृथ्वी शॉ याने ६३ चेंडूत ४६ धावांची खेळी केली तर बी. लालवानी याने ६४ चेंडूंत ३७ धावा केल्या. यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे याच्यासह सात फलंदाज फार चमकदार कामगिरी करू शकले नाहीत. तरी शार्दुल ठाकूर याने मुंबईच्या संघाला एकहाती सावरून घेतले. त्याने ६९ चेंडूत ७५ धावा कुटल्या. त्याने आठ चौकार आणि तीन षटकार मारले. या जोरावर मुंबईच्या संघाने २२४ धावा उभ्या केल्या. दुसरीकडे विदर्भकडून हर्ष दुबे आणि यश ठाकूर यांनी प्रत्येकी तीन फलंदाज माघारी धाडले तर अनुभवी उमेश यादव याने दोन फलंदाजांना आणि आदित्य ठाकरे याने एका फलंदाजाला बाद केले.
यानंतर फलंदाजीला आलेल्या विदर्भाच्या संघाला केवळ १०५ धावा जोडता आल्या. ठराविक अंतराने विदर्भाच्या संघाचे फलंदाज बाद होत राहिले. यश राठोड याने ६७ चेंडूत २७ धावा केल्या. त्याने विदर्भाकडून पहिल्या डावात सर्वाधिक धावा केल्या. याशिवाय बाकी फलंदाजांनी निराशा केली. मुंबईकडून धवल कुलकर्णी, शाम्स मुलानी आणि तनुश कोटियन यांनी प्रत्येकी तीन फलंदाजांना तंबूत धाडले. तर, शार्दुल ठाकूर याने एका फलंदाजाला वाद केले.
दुसऱ्या डावात मुंबईच्या संघाने चमकदार कामगिरी करत ४१८ धावा उभ्या केल्या. मुशीर खान याने दुसऱ्या डावात ३२६ चेंडूत १३६ धावा केल्या. कर्णधार अजिंक्य रहाणे याने १४३ चेंडूत ७३ धावा जोडल्या. श्रेयस अय्यर याने १११ चेंडूत ९५ धावांची खेळी साकारली आणि मुलानी यानेही ८५ चेंडूत ५० धावांची खेळी केली. या जोरावर मुंबईच्या संघाने ४१८ धावांचा डोंगर विदर्भसमोर उभा केला होता. या डावात विदर्भाकडून हर्ष दुबे याने सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या. तर, यश ठाकूर याने तीन फलंदाज माघारी धाडले.
विदर्भाकडून दुसऱ्या डावात कर्णधार अक्षय वाडकर याने सर्वाधिक १०२ धावांची शतकी खेळी केली. तर, करुण नायर याने ७४ धावांची खेळी केली. हर्ष दुबे याने ६५ धावा केल्या. सलामी फलंदाज अथर्व तायडे आणि ध्रुव शौरी या दोघांनी प्रत्येकी ३२ आणि २८ धावा केल्या. अमन मोखाडे याने ३२ धावांचं योगदान दिलं. मुंबईकडून तनुष कोटीयन याने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. मुशीर खान आणि तुषार देशपांडे या दोघांच्या खात्यात दोन विकेट्स आहेत. तर शम्स मुलानी आणि धवल कुलकर्णी यांनी एक- एक विकेट घेतली. विदर्भ संघाने कडवी झुंज देत ३६८ धावा उभ्या केल्या होत्या. पण अखेर त्यांचा १६९ धावांनी पराभव झाला.
हे ही वाचा:
दिल्ली:निवासी इमारतीला आग, चार जणांचा मृत्यू!
पश्चिम बंगाल: शाहजहान शेखच्या ठिकाणांवर ईडीचा छापा!
उत्तर प्रदेशात एनडीएला मिळणार ७७ जागा
‘मंत्री नसतो तर त्यांचे तुकडेतुकडे केले असते’
विजयी संघाला १० कोटींचे बक्षीस
दरम्यान, रणजी ट्रॉफीसह विजेत्या संघावर कौतुकाचा आणि बक्षिसांचा वर्षाव होत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने पाच कोटी रुपये आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन म्हणजेच एमसीएने पाच कोटी रुपये असे एकूण १० कोटींचे बक्षीस विजयी संघाला घोषित केले आहे.