कांदिवली ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या पे अँड पार्कमध्ये पावसामुळे रिक्षा, दुचाकींसह ४०० पेक्षा अधिक गाड्या बुडाल्या आणि या गाड्यांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानग्रस्तांना प्रत्येकी १० हजार रुपये नुकसानभरपाई ताबडतोब मिळायला हवी, अशी मागणी भाजपा नेते आणि स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. शिवाय, मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे हे या काळात कुठे गायब झाले, असा सवालही उपस्थित केला.
भातखळकर यांनी प्रत्यक्ष या पे अँड पार्कला भेट दिली आणि परिस्थितीची पाहणी केली. तेव्हा ते म्हणाले, अंडरग्राऊंड पार्किंगमध्ये प्रचंड पाणी जमले आहे. त्यात रिक्षा, बाईक्स आणि अन्य खासगी गाड्या अडकल्या आहेत. त्यात आवश्यक त्या संख्येने पंप लावून पाणी काढण्याचा प्रयत्न झाला नाही किंवा एनडीआरएफची मदतही घेतली गेली नाही. यात जवळपास ४०० गाड्या अडकल्या आहेत. त्यामुळे दुकानदारांचे, सर्वसामान्य लोकांचे नुकसान झाले आहे. मी यासंदर्भात पालकमंत्र्यांना लिहिले आहे. या नुकसानग्रस्तांना भरपाई मिळायला हवी, प्रत्येक घरामागे १० हजार रुपये द्यायला हवेत, अशी मागणी केली आहे. पण दुर्दैवाने जशी वीज गायब आहे, पाणी गायब आहे तसे पालकमंत्रीही एक वर्षापासून गायब आहेत.
हे ही वाचा:
हँग झालेल्या वेबसाईटचीही आता चौकशी होणार
भारतात ओटीटी प्लॅटफॉर्मला मोठी लोकप्रियता
वारकऱ्यांसाठी पंढरपूरची एकही एसटी नाही
जय हो! लडाखमध्ये चार नवे विमानतळ आणि ३७ हेलिपॅड
भातखळकर पुढे म्हणाले की, पालिकेचे हे अपयश आहे. २०० मिमी पाऊस तीन तासांत आला हे वास्तव आहे. पण अशा घटनांना तात्काळ प्रतिसाद कसा देता यावर तुमची क्षमता ठरत असते. कारण अजून इथे पाणी नाही, वीज नाही, एनडीआरएफला बोलावलेले नाही. त्यामुळे महापालिकेचे हे शंभर टक्के अपयश आहे.
भातखळकर यांनी मागणी केली की, रिक्षाचालकांच्या नुकसानीचा तहसीलदारांच्या माध्यमातून पंचनामा व्हायला हवा. तो नजर पंचनामा व्हायला हवा. प्रत्येकाच्या खात्यात प्रथम १० हजार रुपये जमा करावेत आणि नंतर प्रत्यक्ष झालेले नुकसानही भरून द्यावे.