भारतीय सैन्याची ताकद वाढणार असून भारतीय सैन्य लवकरच ४०० नवीन हॉवित्झर तोफा खरेदी करणार आहे. या खरेदीसाठी ६ हजार ५०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यासाठी सैन्याने संरक्षण मंत्रालयाकडे खरेदीचा प्रस्ताव पाठवला आहे. विशेष म्हणजे डीआरडीओने विकसित केलेल्या या तोफा पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर भारत मोहिमेला चालना मिळणार आहे.
या प्रस्तावानंतर केंद्र सरकार एक उच्चस्तरीय बैठक घेणार असून या बैठकीत हॉवित्झर तोफा खरेदी करण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. हॉवित्झर म्हणजे लहान तोफा. “हॉवित्झर ही ऍडव्हान्स टोड आर्टिलरी गन सिस्टीम” (एटीएजीएस) तोफ आहे. या तोफेची कॅलिबर १५५ – एमएम आहे. या आधुनिक तोफेतून १५५ – एमएम शेल डागता येणार आहेत. किंबहुना दुसऱ्या महायुद्धात आणि त्यापुढील काळात युद्धात खूप मोठ्या आणि जड तोफांचा वापर करण्यात आला. त्यांना लांब अंतरावर नेण्यात आणि उंचावर तैनात करण्यात अनेक अडचणी आल्या. अशा स्थितीत हलक्या आणि छोट्या तोफा बनवल्या गेल्या, ज्यांना हॉवित्झर असे म्हणतात.
तोफेची वैशिष्ट्ये
ही तोफ पुण्यातील डीआरडीओच्या लॅब एआरडीई, भारत फोर्ज लिमिटेड, महिंद्रा डिफेन्स नेव्हल सिस्टीम, टाटा पॉवर स्ट्रॅटेजिक आणि ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डाने विकसित केली आहे. यांचे विकासकाम २०१३ मध्ये सुरू झाले आणि पहिली यशस्वी चाचणी १४ जुलै २०१६ रोजी घेण्यात आली. या तोफेचा वापर आणि वैशिष्ट्ये बोफोर्स तोफेशी मिळतीजुळती आहेत. ही तोफ जुन्या तोफांपेक्षा खूपच हलकी आहे. या तोफातून डागलेल्या शेलची रेंज ४८ किलोमीटर आहे, तर बोफोर्स तोफ ३२ किलोमीटर अंतरापर्यंत गोळीबार करू शकते. हे १५५ एमएम श्रेणीतील जगातील सर्वात लांब अंतरापर्यंत शेल फायर करण्यास सक्षम आहे.
हे ही वाचा:
कुख्यात गुंड आतिकच्या भावाच्या बेनामी संपत्तीची रहस्ये उलगडली
तरुणाने आत्महत्येचे पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी त्याला हेरले!
‘कॅनडा म्हणजे मारेकऱ्यांचा गड’!
राजस्थानमध्येही भाजपकडून नव्या चेहऱ्यांना संधी?
ही तोफ – ३० अंश सेल्सिअस ते ७५ अंश सेल्सिअस तापमानात अचूक गोळीबार करू शकते. या तोफेच्या बॅरलमधून दर मिनिटाला ५ शेल डागता येतात. यात ऑटोमॅटिक रायफलसारखी सेल्फ लोडिंग सिस्टिमही आहे. या तोफेला लक्ष्य करण्यासाठी थर्मल साईट सिस्टीम बसवण्यात आली आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळीही अचूक लक्ष्य ठेवता येते. याशिवाय वायरलेस कम्युनिकेशन सिस्टिमही त्यात आहे.