प्रवासी खचाखच भरले, उत्तराखंडमध्ये बस कोसळून ३६ ठार!

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचे चौकशीचे आदेश

प्रवासी खचाखच भरले, उत्तराखंडमध्ये बस कोसळून ३६ ठार!

उत्तराखंडमधील अल्मोडा येथे बस दरीत कोसळून मोठा अपघात झाला आहे. प्रवाशांनी खचाखच भरलेली बस दरीत कोसळल्याने ३६ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर १९ जण जखमी झाले आहेत. जखमींना वेगवेगळ्या रुगणालयात दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी पिडीतांना आर्थिक मदत जाहीर केली असून चौकशीचे आदेश दिले आहेत.

गढवाल-रामनगर मार्गावरील सॉल्ट भागात हा अपघात झाला. पोलीस आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) चे पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य सुरू आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातामागे बसचे ओव्हरलोडिंग कारण असू शकते. त्यामुळे बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस दरीत कोसळली. अल्मोडाचे पोलीस अधीक्षक देवेंद्र पिंचा यांनी सांगितले की, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा : 

कलम ३७० रद्द करणाऱ्या ठरावावरून विधानसभेत गोंधळ

जरांगेंची निवडणुकीतून माघार, भुजबळ म्हणाले, ‘देर आये दुरुस्त आये’

मुस्लिम, दलित साथ न मिळाल्याने मनोज जरांगे यांची निवडणुकीतून माघार!

कॅनडात खलिस्तानींचा हिंदू मंदिरावर हल्ला, भाविकांना लाठीमार!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान मदत निधीतून प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी १ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे, अशी माहिती एएनआयने दिली. तसेच कुमाऊ विभागाच्या आयुक्तांना या घटनेची दंडाधिकारी चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी या भागातील सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (अंमलबजावणी) यांना निलंबित करण्याचे आदेशही दिले.

Exit mobile version