भारतीय हवाई दल पुढील दोन दशकात ३५० विमाने खरेदी करण्याचा विचार करत आहे, अशी माहिती एअर चीफ मार्शल आर के एस भदौरिया यांनी नुकतीच दिली. भारतीय हवाई क्षेत्राविषयी आयोजित एका परिषदेमध्ये त्यांनी ही माहिती दिली. यासंदर्भात अधिक बोलताना ते म्हणाले, आता लढाऊ विमाने खरेदी करण्याची तयारी सुरू आहे. तसेच, विमान स्वदेशी कंपन्यांकडूनच खरेदी केले जातील. हवाई दल प्रमुखांनी भारतीय एरोस्पेस क्षेत्राच्या विषयावर आयोजित परिषदेला संबोधित करताना सांगितले की, चीनला भेडसावत असलेली आव्हाने पाहता, भारतीय हवाई दलाची संपूर्ण ताकद आणखी मजबूत करण्यावर भर दिला जात आहे.
हवाई प्रमुख आर के एस भदौरिया म्हणाले की, उत्तरेच्या शेजारील देशाकडे पाहताना आपल्याकडे उच्च दर्जाचे तंत्रज्ञान असले पाहिजे, जे सुरक्षेच्या कारणास्तव आपल्याच मातीतले म्हणजे स्वदेशी बनावटीचे असायला हवे.
एअर चीफ मार्शल भदौरिया यांनी विविध आव्हानांना सामोरे जाण्यासाठी संरक्षण क्षेत्रात भारताच्या स्वावलंबनावर भर दिला. भारतीय हवाई दल पुढील दोन दशकात देशातून सुमारे ३५० विमाने खरेदी करण्याची तयारी करत आहे. हा एक ढोबळ अंदाज आहे असेही ते म्हणाले.
हे ही वाचा:
बायकोच्या त्रासामुळे त्याचे २० किलो वजन घटले!
‘पीएचडी, पदवी न घेताच तालिबानी नेते मोठे आहेत!’
महिला पोलिस शिपायानेच काढला आपल्या पोलिस सहकाऱ्याचा ‘काटा’
प्रवाशांच्या नाराजीनंतर नवे मार्ग शोधण्याचाच ‘बेस्ट’ पर्याय
भदौरिया पुढे म्हणाले की, तेजस लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट प्रकल्पामुळे भारताच्या एरोस्पेस उद्योगामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे आणि तो आणखी वाढण्याची अफाट क्षमता असल्याचा आत्मविश्वासही निर्माण झाला आहे. जटिल परिस्थितीत क्षमता सुधारण्यासाठी काम केले पाहिजे, असेही यावेळी भदौरिया म्हणाले. भारतीय हवाई दल जटिल परिस्थितीत देखभाल आणि परिचालन क्षमता सुधारण्याचा तसेच सक्रीय पाठपुराव्यावर भर देण्याचा प्रयत्न करत आहे.