पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या प्रवाशांना येत्या शनिवारपासून महिनाभर प्रवासाचे विशेष नियोजन करावे लागणार आहे. पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव आणि कांदिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गासाठी हा ब्लॉक घेण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
गोरेगाव आणि कांदिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गासाठीच्या कामासाठी म्हणून ३१ ऑगस्टपासून ३५ दिवस हा ब्लॉक असणार आहे. यातील पाच दिवस १० तासांचा पॉवर ब्लॉक असणार आहे. ब्लॉक कालावधीत रेल्वे फेऱ्यांवर मोठा परिणाम होणार असून तब्बल ९६० लोकल फेऱ्यांवर परिणाम होणार आहे. शिवाय मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांची वाहतूकही विलंबाने होणार आहे.
मालाड स्थानकाच्या पूर्वेला सहाव्या मार्गिकेसाठी जागा नसल्याने पश्चिमेला सहावी मार्गिका उभारण्यात येत आहे. याची जोडणी अन्य मार्गिकेला देण्यासाठी पाच ठिकाणी कट अँड कनेक्शन करण्यात येईल. शनिवार-रविवारमध्ये असलेल्या ब्लॉक कालावधीत ही कामे करण्यात येणार आहेत. दरम्यान, भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नसल्याचे पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले आहे.
ब्लॉक काळात वेगमर्यादेमुळे १८-२० मेल-एक्स्प्रेस १५-२० मिनिटांसाठी विविध स्थानकांत थांबवण्यात येणार आहेत. २८ सप्टेंबरच्या मध्यरात्री १२नंतर गोरेगाव ते कांदिवली दरम्यान पाचव्या मार्गिकेवर यांत्रिक काम (नॉन इंटरलॉकिंग) हाती घेण्यात येईल. यामुळे वांद्रे टर्मिनसवरून सुटणाऱ्या गाड्या ४० ते ४५ मिनिटे विलंबाने धावतील.
गोरेगाव-कांदिवली दरम्यान सहावी मार्गिका कार्यान्वित झाल्यामुळे गोरेगाव ते बोरिवलीदरम्यान पाचव्या मार्गिकेवरील रेल्वेचा भार कमी होईल. सध्या मुंबई सेंट्रलला जाणाऱ्या रेल्वेगाड्या गोरेगाव-बोरिवली दरम्यान पाचव्या मार्गिकेवरून चालवल्या जात आहेत. गोरेगाव-कांदिवली दरम्यान सहावी मार्गिका सुरू झाल्यावर अप आणि डाउन रेल्वेसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध होतील. यामुळे लोकल आणि मेल-एक्स्प्रेसच्या वक्तशीरपणात सुधारणा होण्यास मदत होऊन अतिरिक्त जलद लोकल फेऱ्या चालवण्याचा पर्याय उपलब्ध होईल.
हेही वाचा..
काँग्रेस आणि समाजवादी पक्ष आरक्षणविरोधी
इस्रायल, हिजाबुल्ला आमनेसामने; एकमेकांवर डागली रॉकेट्स
महाराष्ट्राच्या बदललेल्या राजकारणावरील हिंदुत्ववाद्याची व्यथा!
‘किसान एक्सप्रेस’चे डबे झाले वेगळे; ८ डबे रेल्वेस्थानकावर तर १३ डबे रुळावर !
पहिला ब्लॉक-
- ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर
- कालावधी: १० तास
- लोकल फेऱ्या: १५० रद्द, ५० अंशतः
दुसरा ब्लॉक-
- ७ ते ८ सप्टेंबर
- कालावधी: १० तास
- लोकल फेऱ्या: १५० रद्द, ५० अंशतः
तिसरा ब्लॉक-
- २१ ते २२ सप्टेंबर
- कालावधी: १० तास
- लोकल फेऱ्या: १५० रद्द, ५० अंशतः
चौथा ब्लॉक-
- २८ ते २९ सप्टेंबर
- कालावधी: १० तास
- लोकल फेऱ्या: १८० रद्द, ५० अंशतः
पाचवा ब्लॉक-
- ५ ते ६ ऑक्टोबर
- कालावधी: १० तास
- लोकल फेऱ्या: १०० रद्द, ३० अंशतः