मुंबईतील वीर माता जिजाबाई भोसले उद्यानामध्ये एप्रिल २०१९ ते मार्च २०२० या कालावधीत तब्बल ३० गोड्या पाण्यातील कासवांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय प्राणिसंग्रहालय अधिकाऱ्यांनी तयार केलेल्या वार्षिक यादीतून ही माहिती समोर आली आहे. या यादीत कासावांसोबतच सात भेकर (barking deer), सहा सांबर हरीण आणि एक बाराशिंगाचाही (swamp deer) समवेश आहे. बाराशिंगा वगळता इतर सर्व प्राणी हे नैसर्गिकरीत्या मृत झाले असल्याची माहिती वीर माता जिजाबाई भोसले उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली.
प्राणिसंग्रहालयाचे संपूर्ण लक्ष हे सध्या फक्त पेंग्विनवर आहे. एका प्रजातीच्या ३० प्राण्यांचा मृत्यू होणे हे थोडे असामान्य आहे. या प्रकरणाची चौकशी करणे गरजेचे आहे, असे वकील आणि कार्यकर्ता गॉडफ्रे पिमेन्टा यांनी ‘टाइम्स’शी बोलताना सांगितले.
गोड्या पाण्यातील मृत पावलेली कासवे ही सुमारे ४०- ५० वर्षे वयाची होती. किडनी, श्वसनप्रणाली फेल झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला कासव हे प्राणिसंग्रहालयातील जुन्या तलावात होते. मात्र, नुकतेच कासवांना नवीन बांधलेल्या तलावात ठेवण्यात आले आहे. अजूनही १२ ते १३ कासव हे वयस्कर असून प्रजनन झाल्यामुळे सुमारे आठ ते नऊ नवजात कासवांची भर पडल्याचे डॉ. त्रिपाठी यांनी सांगितले.
हे ही वाचा:
निविदा मंजूर होण्याआधीच कंत्राटदाराने घेतले खड्डे बुजवायला!
उलट्या मार्गाने जाणाऱ्या १३० दुचाकीस्वारांना पोलिस रोज करताहेत सरळ
क्रूझवर रंगली पार्टी, भरसमुद्रात एनसीबीची कारवाई
तुमच्या राजकारणापायी शेतकऱ्यांचा बळी देऊ नका
सांबर हरिणाची एक जोडी असून सात भेकर आहेत, तर २५ ते ३० ठिपके असलेली हरणे आहेत. बाराशिंगा प्रकरणात नर आणि मादी दोघांना एकत्र ठेवण्यात आले होते. मात्र, एका रात्री दोघांमध्ये झालेल्या भांडणामुळे मादी जखमी झाली आणि तिचा मृत्यू झाला, असे त्रिपाठी यांनी सांगितले.
इतके कासव मृत पावणे ही घटना साधी नाही. किडनी फेल किंवा श्वसन प्रणालीतील त्रुटी हे आजार काही संसर्ग झाल्याचे दर्शवतात. प्रदूषण किंवा काही संसर्ग झाला असू शकतो. तसेच नर बाराशिंगाच्या हल्ल्यात मादीचा मृत्यू झाला हे कारणही न पटण्यासारखे आहे. बाराशिंगा हा धोकादायक प्राणी आहे; असे असताना त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवणे अपेक्षित असते, असे निसर्ग शास्त्रज्ञ शार्दुल बाजीकर यांनी सांगितले.
प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांचा मृत्यू झाल्यावर शवविच्छेदन करून त्यांच्या मृत्यूचे कारण नोंद करून ठेवण्यात येते, असे संचालकांनी सांगितले.