हल्द्वानी हिंसाचाराप्रकरणी ३० जणांना अटक

देशी बनावटीच्या सात पिस्तुल, ५४ गोळ्या जप्त करण्यात आल्या

हल्द्वानी हिंसाचाराप्रकरणी ३० जणांना अटक

उत्तराखंडमधील हल्द्वानी भागातील बनभूलपुरामधील अवैध मशिद आणि मदरसा जमीनदोस्त केल्यानंतर उसळलेल्या हिंसाचाराप्रकरणी पोलिसांनी रविवारी २५ जणांना अटक केली. त्यामुळे याप्रकरणी अटक केलेल्या समाजकंटकांची संख्या ३० झाली आहे. मात्र राज्य सरकारने केंद्र सरकारकडे अतिरिक्त केंद्रीय दलांची मागणी केली आहे. त्यामुळे प्रत्येकी १०० जवानांच्या केंद्रीय निमलष्करी दलाच्या चार तुकड्या बनभूलपुरा भागात लवकरच तैनात होणार आहेत.

या प्रकरणी तीन गुन्हे दाखल झाले असून रविवारी २५ जणांना अटक करण्यात आल्याचे नैनितालचे एसएसपी नारायण मीना यांनी सांगितले. या २५ जणांकडून देशी बनावटीच्या सात पिस्तुल, ५४ गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. जेव्हा त्यांनी बनभूलपुरा पोलिस ठाण्यावर हल्ला केला, तेव्हा त्यांनी सरकारच्या दारुगोळ्याचीही लूट केली होती. त्यातील ९९ जप्त करण्यात आले आहेत. मात्र पोलिस या प्रकरणातील म्होरक्यांचा शोध घेत आहेत. जेथे हिंसाचार उसळला होता, तेथील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे.

हे ही वाचा:

मोठा निर्णय! ‘सीआरपीएफ’ची परीक्षा मराठीत देता येणार

पंतप्रधान मोदींकडून रोजगार मेळाव्यात १ लाख नियुक्ती पत्रांचे वाटप

काँग्रेसला गळती; अशोक चव्हाणांनी सोडला काँगेसचा ‘हात’

राजस्थान: विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी धाव घेऊन उधळून लावला धर्मांतराचा खेळ!

सद्यपरिस्थितीत सुमारे ११०० सुरक्षारक्षक आधीच येथे तळ ठोकून आहेत. हल्द्वानी येथे उसळलेल्या हिंसाचारात सहा दंगलखोर मारले गेले असून ६० जण जखमी झाले आहेत.

सोमवारपासून बनभूलपुरा पोलिस ठाण्याच्या अंमलाखालील काही भाग वगळता येथील संचारबंदी उठवण्यात आली आहे. सोमवारपासून शाळा आणि सर्व अंगणवाडी केंद्रे खुली झाली आहेत. रविवारी मात्र बनभूलपुरा भागातील सर्व दुकाने बंद होती आणि रस्त्यांवरही तुरळक गर्दी होती. तर, अफवांना लगाम बसावा, म्हणून इंटरनेट सेवा स्थगित करण्यात आली होती. हिंसाचाराप्रकरणी न्यायदंडाधिकारी चौकशीचे आदेश देण्यात आले असून हा अहवाल १५ दिवसांत सादर करणे अपेक्षित आहे.

Exit mobile version