२६ जुलै २००५ ते आज २६ जुलै २०२१ तब्बल १६ वर्षांचा काळ गेला. २००५ साली मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईचे जीणं मुश्किल झाले होते. आज या घटनेला तब्बल १६ वर्षे उलटतील. १६ वर्षानंतरही मुंबईच्या जगण्यामध्ये काहीच बदल झाला नाही. दिवसागणिक आणि वर्षागणिक शहराची अवस्था अधिकच बिकट होऊ लागली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तर अतिवृष्टीने माणसाची झोपच उडवली आहे.
पालिका प्रशासनाचे पाणी न साठण्याचे दावे गेल्या काही वर्षाप्रमाणे यंदाही फोल ठरले आहेत. मुंबईतील नदीपात्रात भराव टाकल्याने पालिका प्रशासनाचा गलथान कारभार आता समोर आलेला आहे. मुंबईवर इतके वर्षे राज्य करणारी महापालिका केवळ आश्वासनांशिवाय मुंबईकरांना काहीच देऊ शकत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मुंबईमधील तब्बल २७१ नवीन ठिकाणी आता पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे. ग्रॅन्टरोड, वरळी, वांद्रे पश्चिम, अंधेरी परिसरात आता नव्याने पाणी साठण्यास सुरुवात झालेली आहे. मुंबईतील नदीपात्रातील भराव हे मुख्य कारण पाणी तुंबण्याचे आहे.
हे ही वाचा:
महाराष्ट्रात आत्तापर्यंत पुरामुळे १३८ जणांनी गमावले प्राण
मुख्यमंत्री साहेब, तुम्ही हात जोडू नका!
मुख्यमंत्र्यांचा ‘पालखी सोहळा’ पूरग्रस्तांच्या दारी
…तर मीराबाईचे रौप्यपदक होणार सोनेरी
नदी नाल्याचे रुंदीकरण, पंपिंग स्टेशन, पर्जन्य जलवाहिन्यांची दर्जोन्नती अशा अनेक प्रकल्पांवर कोट्यावधी रुपये महापालिकेने खर्च केले. तरीही मुंबई दिवसागणिक अधिक तुंबू लागलेली आहे. मुख्य म्हणजे गेल्या दोन वर्षांपेक्षा मुंबईत तुंबण्याची ठिकाणे आता वाढलेली आहेत. मिठी नदीचे तेव्हाही गटार होते, आजही गटारच आहे. शहराच्या मध्यभागातून वाहणारी एक नदी महापालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आज गटार झालेली आहे.
मिठीचे उग्र रुप यंदाच्या पावसात मुंबईकराने अनुभवले. गेल्या १६ वर्षांमध्ये मुंबईची तुंबई होऊ नये म्हणून अनेक प्रयत्न करण्यात आले. परंतु हे सर्व प्रयत्न तकलादूच ठरले. पंपिंग स्टेशनवरही करोडोंचा खर्च झाला, परंतु तरीही मुंबईची तुंबई झालीच. काही ठिकाणी आजच्या घडीला पपिंग स्टेशनची कामे अर्धवटच असल्याचे निदर्शनास येत आहे. महापालिकेने मुंबईकडे केलेले दुर्लक्ष मुंबईकरांना चांगलेच महागात पडत आहे.