वर्षाच्या अखेरीस भारतातील सर्वांत मोठे डोपिंग प्रकरण उघडकीस आले आहे. गोव्यामध्ये २५ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबरपर्यंत झालेल्या राष्ट्रीय खेळांमध्ये २५ खेळाडू उत्तेजक सेवनाच्या चाचणीत अडकले आहेत. यातील नऊ ऍथलीटसह बहुतेकजण पदकविजेते आहेत. वेटलिफ्टिंगमधील नऊ खेळाडूही उत्तेजक सेवन चाचण्यांत अनुत्तीर्ण झाले आहेत. यात काही आंतरराष्ट्रीय खेळाडूही आहेत. ‘नाडा’ने सर्वांना ‘बी’ सँपल करण्यास सांगितले आहे.
राष्ट्रीय डोपिंगविरोधी एजन्सीने (नाडा) स्टिरॉइड घेतल्याने उत्तेजक सेवन चाचणीत अडकलेल्या खेळाडूंवर तात्पुरती बंदी आणली आहे. राष्ट्रीय डोप चाचणी प्रयोगशाळेत आणखी चाचण्या सुरू असल्याने प्रतिबंधित खेळाडूंची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यात आणखी चार ते पाच खेळाडू अडकू शकतात. एवढ्या मोठ्या संख्येने खेळाडू डोपमध्ये अडकत असल्याने आयोजक आणि भारतीय संघाची झोप उडाली आहे.
कोण आहेत हे खेळाडू?
डोपिंग चाचणीत पॉझिटिव्ह आढळलेल्या खेळाडूंमध्ये वेटलिफ्टिंमध्ये सुवर्णपदक जिंकणारी उत्तर प्रदेशची वंदना गुप्ता, २०० मीटरमध्ये रौप्य पदक जिंकणारी कमलजीत कौर, पाच हजार मीटरमध्ये ब्राँझ पदक जिंकणाऱ्या अजयकुमारसह ऍथलीट फरमान अली, प्रवीण कुमार, वी नेहा, हरजोधवीर सिंह, मुक्केबाज भावना, रौप्य पदक जिंकणारी सायकलपटू अनिता देवी यांचा समावेश आहे.
हे ही वाचा:
रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जायचे की नाही?
कतारमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या ८ नौदल अधिकाऱ्यांना मोठा दिलासा, शिक्षेला स्थगिती!
करणी सेना प्रमुखावर गोळीबार करणाऱ्या आरोपीच्या घरावर बुलडोजर!
ठाकरे गटाला २३ जागा मग आम्हाला काय? काँग्रेसचा सवाल!
पहिल्यांदाच बिलियर्ड्सचा खेळाडूही पॉझिटिव्ह
यंदा पहिल्यांदाच बिलियर्ड्सचा खेळाडूही डोपिंगमध्ये पकडला गेला आहे. ऍथलेटिक्स व वेटलिफ्टिंगसह बॉक्सिंगचे दोन, सायकलिंग, कुस्ती, ट्रायथॉलन, नेटबॉल, कबड्डीचे प्रत्येकी एकेक खेळाडू डोपिंगमध्ये अडकले आहेत.
याआधीही डोपिंगची प्रकरणे उघड
सन २०१५मध्ये केरळ येथे झालेल्या राष्ट्रीय खेळ स्पर्धांमध्ये १६ खेळाडू उत्तेजक सेवन चाचणीत पकडले गेले होते. गेल्या वर्षी गुजरातमध्ये झालेल्या राष्ट्रीय खेळांमध्ये १० खेळाडू डोप पॉझिटिव्ह आढळले होते. यामध्ये राष्ट्रकुलमधील सुवर्णपदक विजेता संजीता चानू हिचादेखील समावेश होता. त्यांच्यावर चार वर्षांची बंदी घालण्यात आली होती.