ओएनजीसी बार्जवरच्या २२ लोकांचे मृतदेह सापडले

ओएनजीसी बार्जवरच्या २२ लोकांचे मृतदेह सापडले

मुंबई हाय येथे ओएनजीसीचे एक बार्ज बुडाल्यामुळे मृत झालेल्या २२ लोकांचे मृतदेह नौदलाच्या हाती आले आहेत. तौक्ते चक्रीवादळामुळे आत्तापर्यंतचा हा सर्वात मोठा मृतांचा आकडा ठरला आहे. भारतीय नौदल, तटरक्षक दलासह विविध कंपन्या या क्षेत्रात शोध व बचावकार्य करत आहेत. ओएनजीसीच्या या बार्जवर २७३ लोक अडकले होते. त्यापैकी १८८ लोकांची सुखरूप सुटका करण्यात आली तर उर्वरितांचा शोध चालू आहे.

आतापर्यंत एकूण १८८ कर्मचाऱ्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. खोल समुद्रातील ‘मुंबई हाय’ येथील हीरा ऑईल रिग परिसरात ओएनजीसीचा ‘पी-३०५’ हा बार्ज आहे. तेथे ॲफकॉन्स कंपनीकडून तीन विहिरींवर काम सुरू आहे. यासाठी तब्बल २७३ कर्मचारी तेथे कार्यरत होते.

हे ही वाचा:

मोदींनी गुजरातला तौक्ते नंतर १ हजार कोटींची मदत केली जाहीर

क्रीडामंत्री किरण रिजिजू का रागावले?

पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय मागे

आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारच्या मंत्र्यांमध्येच जुंपली

‘तौक्ते’ चक्रीवादळाचा परिणाम म्हणून सोमवारी समुद्र खवळलेला राहिला. त्यामुळे बार्जला धक्के लागणे बसू लागले. त्यामुळे बार्ज प्रमुखांनी बचावाचा संदेश पाठवला. त्यानुसार नौदलाने सोमवारी दुपारनंतर बचाव सुरू केला.

नौदलाने सुरुवातीला ‘आयएनएस कोलकाता’ व ‘आयएनएस कोची’ या विनाशिका श्रेणीतील युद्धनौका धाडल्या. या दोन्ही विनाशिकांनी धो-धो पाऊस, सोसाट्याचा वारा अशा परिस्थितीत खवळलेल्या समुद्रात रात्रभर बचावाचा प्रयत्न केला. पण कर्मचाऱ्यांपर्यंत पोहचणे अत्यंत अवघड होते. त्याचदरम्यान, हा बार्ज लाटांच्या माऱ्यामुळे समुद्रात बुडाला. तो बुडत असतानाच तेथील अनेक कर्मचाऱ्यांनी समुद्रात उड्या घेतल्या.

अनेक कर्मचारी खवळलेल्या समुद्रात पोहत होते. नौदलाच्या युद्धनौका त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत होत्या. परंतु त्यावेळी परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने त्यातील मोजक्या कर्मचाऱ्यांना वाचवता आले. त्यामुळे नौदलाने सकाळी मोहिमेची व्याप्ती वाढवली आहे. आयएनएस कोलकाता आणि आयएनएस कोची सोबतच आयएनएस बेटवा, आयएनएस तेग, आयएनएस बिआस आणि नंतर आयएनएस शिकारा या नौका त्याशिवाय काही हेलिकॉप्टर यांच्या वापरास देखील प्रारंभ केला.

Exit mobile version