नीट पेपर लीक प्रकरणी महाराष्ट्रामधून दोन शिक्षकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या दोन शिक्षकांपैकी एक लातूर येथे तर दुसरा सोलापूर जिल्हापरिषद शाळेत कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) कारवाई करत शनिवारी (२२ जून) रात्री दोन शिक्षकांना ताब्यात घेतलं. दरम्यान, बऱ्याच वेळ चौकशीनंतर दोन्ही शिक्षकांना सोडण्यात आले आहे.
महाराष्ट्र एटीएसच्या नांदेड युनिटच्या पथकाने ही कारवाई केली. संजय तुकाराम जाधव आणि जलील उमरखान पठाण अशी ताब्यात घेण्यात आलेल्या शिक्षकांची नावे आहेत. संजय जाधव हे चाकूर तालुक्यातील बोथी येथील रहिवासी असून ते सोलापूर जिल्ह्यातील टाकळी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. तर जलील पठाण हे लातूरजवळील कातपूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. हे दोघेही लातूरमध्ये खासगी कोचिंग क्लासेस चालवत असल्याची माहिती आहे.
हे ही वाचा:
लैंगिक अत्याचार प्रकरणी प्रज्वल रेवण्णाच्या भावालाही अटक!
नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या प्रमुखाची हकालपट्टी!
पाकिस्तानच्या संसदेतही पाक कर्णधार बाबर आझम ट्रोल!
मेरठच्या तुरुंगात कैद रवी अत्री नीट पेपरफुटीचा सूत्रधार असण्याची शक्यता!
नीट परीक्षेच्या तयारीसाठी राज्यभरातून हजारो विद्यार्थी लातूरमध्ये येतात. याचाच फायदा घेत लातूरमध्ये नीट परीक्षेच्या पेपर फुटीचं रॅकेट सुरू असल्याचा संशय तपास यंत्रणांना आला. त्यानंतर एटीएसच्या पथकानं लातूरमध्ये दोन ठिकाणी छापे टाकून शनिवारी (२२ जून) रात्री दोन्ही शिक्षकांना ताब्यात घेतलं. दरम्यान, दोन्ही शिक्षकांची चौकशी करून त्यांना सोडण्यात आले आहे.