गेल्या आठवड्यात पुण्यातील कल्याणीनगर भागात एका अल्पवयीन चालकाने पोर्शे गाडी चालवून दोन जणांचा बळी घेतला होता. या अपघाताप्रकरणी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना वेळीच माहिती न दिल्याबद्दल पुणे पोलिसांच्या दोन पोलिस अधिकाऱ्यांना शुक्रवारी निलंबित करण्यात आले आहे.
‘येरवडा पोलिस ठाण्यात तैनात असलेले पोलिस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहायक पोलिस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांना अपघाताची माहिती वायरलेस कंट्रोल रूमला न दिल्याने निलंबित करण्यात आले आहे,’ असे पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, १७ वर्षीय युवकाने पोर्शे गाडी चालवल्याने रविवारी पहाटे शहरात मोटारसायकलीला धडक दिली. त्यात मोटारसायकलीवर असलेले दोन सॉफ्टवेअर इंजिनीअर ठार झाले. आरोपी असणाऱ्या अल्पवयीन मुलास जलदगतीने जामीन मिळाल्याबद्दल गदारोळ माजल्यानंतर बाल न्याय मंडळाने त्याची रवानगी बालगृहात केली होती.
आदल्या दिवशी, पोलिसांनी असेही सांगितले की, पोर्शे गाडी अल्पवयीन मुलाने नव्हे तर, कौटुंबिक चालकाने चालवली होती, हे दर्शविण्यासाठी पुराव्यांशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
हे ही वाचा:
‘नवीन पटनायक यांना व्हीके पांडियन यांनी ओलिस ठेवले आहे’
केरळमध्ये मान्सूनपूर्व पावसाचे थैमान; जनजीवन विस्कळीत
प. बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान टीएमसी नेत्याची हत्या
पुणे अपघात प्रकरण: चालकाला डांबून ठेवल्याप्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या आजोबांना अटक
‘अल्पवयीन आरोपी पबमध्ये दारू पितानाचे सीसीटीव्ही फुटेज आमच्याकडे आहे. आमचा खटला रक्ताच्या अहवालावर अवलंबून नाही कारण आमच्याकडे इतर पुरावेही आहेत,’ असे अमितेश कुमार म्हणाले. ‘तो (अल्पवयीन) पूर्णपणे शुद्धीत होता. त्याला पूर्ण माहिती होती की त्याच्या वागण्यामुळे, कलम ३०४ लागू असलेल्या अशा दुर्घटना घडू शकतात,’ असेही त्यांनी सांगितले.
पोलिस कोठडीत असताना अल्पवयीन मुलाला प्राधान्याने वागणूक देण्यात आल्याचेही सांगण्यात आले. या घटनेनंतर त्याला पिझ्झाही देण्यात आल्याचा आरोप आहे. आरोपांना प्रत्युत्तर देताना कुमार म्हणाले, ‘आम्ही स्पष्टपणे सांगितले आहे की पोलिस ठाण्यात पिझ्झा पार्टी झाली नाही. पण होय, काहीतरी घडले होते, ज्याची आम्ही अंतर्गत चौकशी सुरू केली आहे.’
‘आम्ही आरोपीचे वडील आणि बारमालकांविरुद्ध आधीच गुन्हा दाखल केला आहे. पुराव्याचे तांत्रिक विश्लेषण सुरू आहे,’ असेही त्यांनी सांगितले. याप्रकरणी अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांनाही अटक करण्यात आली आहे. पाचही जणांना ७ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.